अमेरिकेतील अल साल्वाडोर (EI Salvador) या देशाने आपल्या देशातील स्थलांतर रोखण्यासाठी अफ्रिकेतील 50 देश आणि भारतातील पर्यटकांकडून अतिरिक्त 1 हजार डॉलर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन शुल्क 23 ऑक्टोबरपासून लागू झाले आहे.
अल साल्वाडोरच्या पासपोर्ट अॅथोरिटी प्रशासनाने याबाबत वेबसाईटवर नमूद केले आहे की, भारतासहित अफ्रिकेतील 50 हून अधिक देशातील नागरिकांना हे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. शुल्क आकारण्या मागचे कारण आणि आकारलेल्या शुल्काचा विनियोग यामध्ये पासपोर्ट प्राधिकरणाने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती असल्याचे दिसून येते. म्हणजे स्थलांतर रोखण्यासाठी अल साल्वाडोर देश काही ठराविक देशातील पासपोर्टवर प्रवास करणाऱ्यांकडून शुल्क आकारतो आणि या शुल्काचा वापर विमानतळांच्या विकासासाठी वापरणार असे नमूद करतो.
प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
2023 या वर्षाचा विचार करता अमेरिकेच्या कस्टम आणि बॉर्डर पेट्रोलिंग करणाऱ्या यंत्रणेला या वर्षभरात 3.2 दशलक्ष प्रवाशांचा सामना करावा लागला आहे. अनेक प्रवासी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अफ्रिका आणि इतर देशांतून येणाऱ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी अल साल्वाडोर देशाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. दरम्यान अल साल्वाडोरचे राष्ट्रपती नायब बुकेले यांनी नुकतेच स्थलांतराच्या विषयावर अमेरिकेच्या सचिव ब्रायन निकोल्स यांच्याशी चर्चादेखील केली होती. या चर्चेत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर आळा घालण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
अल साल्वाडोर देशाने लागू केलेला अतिरिक्त शुल्काचा निर्णय भारतासह इतर 56 देशातून येणाऱ्या नागरिकांना लागू असणार आहे. हा निर्णय 23 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.