बीबीसीच्या भारतातील मुंबई आणि दिल्लीतील ऑफिसवर इन्कम टॅक्स विभागाने आज धाड टाकली. या धाडीत इन्कम टॅक्स विभागातील सुमारे 60 ते 70 अधिकाऱ्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, आणि कॉम्प्युटर ताब्यात घेऊन त्याचा बॅकअप घेतला आहे. बीबीसीवर टाकलेल्या या छाप्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. पण केंद्र सरकार आणि इन्कम टॅक्स विभागाने ही धाड नसून सर्वेक्षण असल्याचे सांगितले.
बीबीसी माध्यम समुहाने भारत सरकारने घालून दिलेल्या प्रायसिंग नियमांचे पालन केले नसल्याचे सांगितले जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची एक डॉक्युमेंटरी बीबीसीने त्यांच्या साईटवर टाकली होती. त्या डॉक्युमेंटरीवरून बराच राजकीय कलह सुरू झाला होता. त्यात काही मोदी समर्थकांनी बीबीसीवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले. हे छापे राजकीय दबावाने टाकले जात असल्याचे बोलले जाते. पण इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांनी हे छापे ट्रान्सफर प्रायसिंग या विषयाशी निगडित असल्याचे सांगितले.
ट्रान्सफर प्रायसिंग काय आहे?
ट्रान्सफर प्रायसिंग ही अकाऊंटमधील एक प्रक्रिया आहे. यामध्ये एखादी कंपनी एका विभागातून दुसऱ्या विभागाला काही गोष्टी देते किंवा घेते. जसे त्या दोन विभागांमध्ये वस्तु किंवा सेवांचे आदान-प्रदान होत असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होत नाही. फक्त खात्यामध्ये ते दर्शवले जाते. त्यालाच इन्कम टॅक्सच्या भाषेत ट्रान्सफर प्रायसिंग म्हटले जाते.
बीबीसीच्या बाबतीत नेमके काय झाले?
इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांकडून बाहेर आलेल्या माहितीनुसार, बीबीसी नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बीबीसीला अनेकवेळा नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. पण त्यांच्याकडून त्या नोटीसांना उत्तर दिले जात नव्हते. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने रीतसर टॅक्सबाबत पाहणी करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयावर छापे मारले.
ट्रान्सफर प्रायसिंगबाबत यापूर्वीही बरेच वादविवाद झाले होते. इन्कम टॅक्स विभागाने याबाबत वेळोवेळी नियम तयार केले आहेत. या नियमांमुळे इन्कम टॅक्स विभागाला आता कंपन्यांमधील अंतर्गत होणाऱ्या सेवा आणि वस्तुंशी संबंधित माहिती घेता येत आहे. याबाबत इन्कम टॅक्स विभाग जागृत असून त्यांनी अशाप्रकारे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रवित्रा घेतला आहे. त्यामुळे बीबीसीवर केलेली कारवाई हा या नियमाचा भाग आहे, असे इन्कम टॅक्स विभागाचे म्हणणे आहे.