“कोsअहं” अर्थात “मी कोण आहे ?” असं रडणं ऐकू आलं की लेबररूममध्ये बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या आणि कॉरीडोरमध्ये येरझाऱ्या घालत असलेल्या बापाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतात. 8-9 महिने बांधून ठेवलेला भावनेचा बांध फुटलो. हात नकळत जोडले जातात आणि नवीन बाळाच्या आगमनानिमित्त आनंद-घाई सुरु होते. नवजात बालकासोबतच येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि करावयाची कर्तव्ये यांची देखील सूचना डॉक्टर देतातच. बालकाचे निरोगी असणे हे कोणाही मात्यापित्यासाठी हायसं वाटण्याचा क्षण. परंतु काही परीक्षेच्या वेळा बघणाऱ्या सूचना जेव्हा डॉक्टर देतात, तेव्हा मात्र बाळाचे आई-वडील भांबावून जातात. काही प्रश्नचिन्हे उभी राहतात. उत्तरं लगेच मिळत नाहीत.
नवजात बालकांच्या इन्शुरन्स पॉलिसीबाबत कंपन्या उदासीन!
काहीवेळा जन्माला येणारे बाळ (New Born Baby) एखादा अनुवांशिक आजार, जन्मजात व्याधी अथवा विकार घेऊनच जन्माला येतात. जन्मतः ओठ फाटलेला असणे, टाळू फुटलेली असणे किंवा हृदयाला छिद्र (Hole in the heart) असणे अशा काही विकाराचा सामना बाळाला आणि परिणामी त्याच्या आई-वडिलांनाही करावा लागणार असतो. अशा केसेसमध्ये सामान्यतः एक निरीक्षण नोंदवले जाते की, बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या अशा विकारांसह जन्मलेल्या नवजात बालकांना इन्शुरन्स पॉलिसी देण्यापासून वगळत आल्या आहेत. यापूर्वी देखील विमा कंपन्या नवजात बालकांसाठी इन्शुरन्स पॉलिसी आणत नव्हत्या. वास्तविक इन्शुरन्स कंपनींचा असा दृष्टिकोन “2047 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला एक लाईफ इन्शुरन्स आणि एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी” (Life Insurance & Health Insurance Policy) असे व्यापक ध्येय धरून चाललेल्या भारत सरकारच्या प्रयत्नांच्या मार्गातील मोठा अडसर ठरत आहे.
ईर्डाचे 1 दिवसाच्या बाळालाही संरक्षण देण्याचे निर्देश!
या विषयावर टिप्पणी करताना इन्शुरन्स (जीवन, सामान्य आणि आरोग्य विमा) क्षेत्रातील सर्वोच्च संस्था IRDAI अर्थात भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाने इन्शुरन्स कंपनीना अतिशय स्वागतार्ह सूचना दिल्या आहेत की, “जन्मजात व्यंग असलेल्या नवजात बालकांना अशा प्रकारे आरोग्य विमा सुविधा देण्यापासून वगळणे, हे इन्शुरन्सच्या मूळ उद्देशाविरुद्ध आहे.” तसेच IRDAI (इर्डा) ने इन्शुरन्स कंपनींना जन्माच्या 1 दिवसापासून जन्मजात व्याधीयुक्त, तसेच अनुवांशिक रोग-विकारांसह जन्मलेल्या अर्भकांना इन्शुरन्स पॉलिसीचे तात्काळ संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अशा केसेसमध्ये प्रीमियमचा दर ठरविण्याचे अधिकार मात्र इन्शुरन्स कंपन्यांकडेच असणार आहेत.
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन!
सद्यस्थितीमध्ये नवजात बाळासाठी वैयक्तिक आरोग्य विमा कवच खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे बालकाला त्याच्या माता-पित्यासोबत “फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन”मध्ये किंवा बालक 90 दिवसांचा झाल्यावर त्याला “ग्रुप हेल्थ इन्शुरन्स स्कीम”मध्ये सामावून घ्यावे लागते. बालकाचे बर्थ सर्टिफिकेट (जन्म नोंदणी प्रमाणपत्र), हॉस्पिटलचे मॅटर्निटी डिस्चार्ज कार्ड, हेल्थ कार्डासाठी बालकाचा फोटो, नवजात अर्भकाची मेडिकल प्रमाणपत्रे आदी डॉक्युमेंट्सची पूर्तता करून त्याला / तिला सामायिक आरोग्य विमा सुविधेचा भाग बनवून घ्यावा लागतो.
मात्र IRDAI ने नुकत्याच प्रसारित केलेल्या सर्क्युलरद्वारे, “मानसिक आरोग्य सेवा कायदा, 2017 च्या तरतुदींनुसार सर्व विमा कंपन्यांना निश्चित केल्या गेलेल्या नियमांचे कोणत्याही अटी शर्तीविना आणि कोणतीही प्रतीक्षा कालावधी किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधात्मक अटी न लादता पालन करावे लागणार आहे आणि त्यांना बालकाच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासून संरक्षण प्रदान करावे लागेल, याचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे अनुवांशिक आजाराने ग्रस्त नवजात बालकांना आणि आईच्या पोटात असलेल्या अर्भकांना मोठा फायदा होणार आहे. बालकांना कोणताही आजार असो, त्यासाठी आता विमा उतरवता येणार आहे.