Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is IRDA in Insurance? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या!

Insurance Regulatory and Development Authority of India

What is IRDA in Insurance : RDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.

What is IRDA in Insurance : “आयआरडीएचे क्रांतिकारी पाऊल", “‘इरडा’च्या नव्या गाईडलाईन्स - विमाकवच वाढवले”, “विमा कंपनीने तुमचा क्लेम फेटाळलाय - IRDA कडे तक्रार नोंदवा”, अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये आपण नित्यनियमाने वाचत असतो. तेव्हा आज आपण मुख्यतः हे आयआरडीए (IRDA) किंवा “इरडा” काय प्रकरण आहे, ते जाणून घेणार आहोत.

“आयआरडीए” अर्थात "Insurance Regulatory and Development Authority of India” (म्हणजेच “भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण”- लघु रूप “इरडा”) हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (Finance Ministry) अधीन असलेले वैधानिक (statutory), स्वतंत्र आणि विमा आणि पुनर्विमाविषयक क्षेत्रामधील सर्वोच्च अशी नियामक प्राधिकरण / संस्था (apex body) आहे.


सन् 1991 पर्यंत खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे वारे भारतामध्ये देखील वाहू लागले होते. भारत सरकारने विमा (Insurance) आणि पुनर्विमा क्षेत्रातील आर्थिक सुधारणांची आवश्यकता ओळखून विमाविषयक सुधारित धोरण आखण्यास सुरुवात केली. सन् 1993 मध्ये रिझर्व्ह बँकेचे निवृत्त गव्हर्नर आर.एन. मल्होत्रा (R. N. Malhotra, Former RBI Governor) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने विमा क्षेत्रात काही मोठ्या सुधारणांची शिफारस केली होती. ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना देशात विम्याचा प्रचार करण्याची परवानगी देणे, परदेशी प्रवर्तकांना देशांतर्गत विम्यामध्ये परवानगी देणे, बाजार, संसद आणि सरकारला उत्तरदायी अशा स्वतंत्र नियामक मंडळाची निर्मिती करणे, इत्यादीचा समावेश होता.

मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार “आयआरडीए”चे गठण हे आयआरडीए अधिनियम, 1999 च्या संसदीय कायद्यानुसार नवी दिल्ली येथे करण्यात आले आणि कालांतराने म्हणजे सन् 2001 मध्ये तिचे मुख्यालय (head quarter) हैद्राबाद, तेलंगणा येथे हलविण्यात आले.

IRDAI

IRDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.

इन्शुरन्स पॉलिसीधारकांचे हित जपणे आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे, इन्शुरन्स प्रॉडक्टसची चुकीची विक्री होण्यापासून थांबवणे, पॉलिसीधारकांची फसवणूक रोखणे आणि विमाविषयक वादांमध्ये दाखल केल्या गेलेल्या दाव्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करणे, विम्याशी संबंधित वित्तीय बाजारपेठांमध्ये पारदर्शकता आणणे, थोडक्यात विमा उद्योगाच्या सर्वंकष वाढीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही मुख्य उद्दिष्ट्ये समोर ठेऊन IRDA कार्यरत आहे.


IRDA चे कार्यक्षेत्र व्यापक असून त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो

विमा कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्रे (Registration Certificate) देणे आणि त्यांचे नियमन करणे, इन्शुरन्स एजंट, इन्शुरन्स ब्रोकर्स, कॉर्पोरेट ब्रोकर्स आणि इन्शुरन्स कंपनीज् यांच्या करिता आचारसंहिता (Code of conduct) तसेच मार्गदर्शक तत्वे (directive principles) तयार करून पात्र विमा-कंपनी, मध्यस्थ यांना परवाने (IRDA license) प्रदान करणे, पॉलिसी-धारकांच्या हिताचे रक्षण करणे, विमा-क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विम्याशी संबंधित व्यावसायिक संस्थांना प्रोत्साहन देणे, तसेच त्यांचे नियमन आणि पर्यवेक्षण (regulation & supervision) करणे.

इन्शुरन्स पॉलिसीचे फिचर्स तसेच प्रीमिअमच्या दरांचे नियमन करणे, इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांचे आर्थिक अहवाल (financial statements) नियमितपणे सादर करण्‍याच्या अटी आणि प्रपत्रे (conditions and formats) निर्दिष्ट करणे, इन्शुरन्स कंपन्यांद्वारे पॉलिसीधारकांच्या निधीच्या गुंतवणुकीचे नियमन करणे, सॉल्व्हन्सी मार्जिनची म्हणजे दावे भरण्याची कंपनींच्या क्षमतेची सुनिश्चितता करणे, इन्शुरन्स विषयक व्यवहार अधिकाधिक डिजिटल प्लॅटफॉर्मव्दारे व्हावेत यासाठी इन्शुरन्स कंपनीज् , एजंट्स तसेच पॉलिसीधारकांना प्रोत्साहित करणे, आणि याव्यतिरिक्त IRDA च्या स्वतःच्या ऑनलाइन परीक्षा घेणे आणि परीक्षेचे निकाल वेबसाईटवर प्रदर्शित करणे, इत्यादी.