विमा कंपन्यांच्या पारंपारिक विमा उत्पादनांवर ग्राहकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षात पारंपारिक विमा योजनांच्या प्रिमीयममध्ये 10.15% इतकी वाढ नोंदवण्यात आली. या वर्षात पारंपारिक विमा उत्पादनांच्या विक्रीतून विमा कंपन्यांना तब्बल 5.92 लाख कोटींचा प्रिमीयम मिळाला असल्याची माहिती विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) अहवालातून समोर आली आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI Report) 2021-22 च्या अहवानुसार विम्याच्या ट्रॅडिशनल प्रॉडक्ट्समधील प्रिमीयम संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयुर्विम्याच्या युनिट लिंक्ड प्रॉडक्ट्समधून (ULIPs) मिळणारा प्रिमीयम देखील वाढला. तर पारंपारिक विमा योजनांच्या प्रिमीयममध्ये 10.15% इतकी वाढ नोंदवण्यात आली. कंपन्यांना 2021-22 या वर्षात पारंपारिक विमा उत्पादनांतून 5.92 लाख कोटींचा प्रिमीयम मिळाला. 2020-21 मध्ये तो 5.38 लाख कोटी इतका होता.
विम्याच्या युलिप योजनांच्या विक्रीमधून कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांचा प्रिमियम मिळाला. यात 10.24% इतकी वृद्धी नोंदवण्यात आली. एकूण प्रिमीयममध्ये युनिट लिंक्ड उत्पादंनांच्या प्रिमीयमचा 14.48% वाटा आहे.
एकूण विमा विक्रीमध्ये आयुर्विमा उत्पादनांचा 77% वाटा आहे. त्याखालोखाल पेन्शन आणि अॅन्युटी उत्पादनांचा एकूण 22% वाटा असल्याचे आयआरडीएआयच्या अहवालात म्हटले आहे. मागील आर्थिक वर्षात आयुर्विमा उत्पादनांच्या विक्रीत 10.70%, पेन्शन उत्पादनांच्या विक्री 13.38% आणि इतर उत्पादनांच्या विक्री 36.66% वृद्धी नोंदवण्यात आली. अॅन्युटी आणि हेल्थ इन्शुरन्सच्या विक्रीत मात्र अनुक्रमे 11.83% आणि 2.68% घसरण झाली.
वर्ष 2020-21 मध्ये पारंपारिक विमा उत्पादनांच्या विक्रीत 9.77% वाढ झाल्याचे दिसून आले. युलिप उत्पादनांच्या विक्रीत 9.58% वाढ झाली. कंपन्यांना युलिप उत्पदनांच्या विक्रीतून 91000 कोटींचा प्रिमीयम मिळाला होता. आयुर्विमा कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा विचार केला तर 24 पैकी 15 कंपन्यांनी 2021-22 नफा नोंदवला.