निवृत्तीची वेळ जवळ आल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडतो. कारण, दर महिन्याला हातात येणारा पगार बंद होणार. काम करत असताना केलेली गुंतवणूक, बचत, आणि भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम आपल्याला उरलेल्या आयुष्यासाठी पुरेल का? हा प्रश्न सहाजिक पडू शकतो. निवृत्तीनंतर हाती आलेले पैसे तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवले नाही तर काही दिवसांतच तुम्ही अडचणी येऊ शकता. तसेच निवृत्तीनंतर (Income after Retirement) जोखीम घेण्याचीही क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळू शकतो, अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे योग्य. निवृत्तीनंतर सुरक्षित गुंतवणूकीसाठी खालील पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता.
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून ७.४% च्या सुमारास गुतंवणूकीवर व्याजदर मिळतो. या योजनेत गुंतवलेल्या पैशांना पाच वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे. १५ लाख रुपयांपर्यंत पैसे तुम्ही योजनेत गुंतवू शकता. दर तीन महिन्यानंतर तुम्हाला यातून व्याजाची रक्कम काढता येते. 80C अंतर्गत करातून सुटकाही मिळते. डेब्ट गुंतवणीतील पर्यायांपैकी चांगला परतावा या योजनेतून मिळतो. केंद्र सरकार पुरस्कृत योजना असल्याने यातून खात्रीशीर परतावा मिळतो. जोखीम कमी असल्याने ही योजना निवृत्तीनंतर पैसे गुंतवण्यासाठी चांगली आहे.
प्रधान मंत्री व्यय वंदना योजना (PMVVY)
जीवन विमा महामंडळ(LIC) कडून फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबवली जाते. या योजनेमध्ये तुम्ही १५ लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकता. सुमारे ७.४ टक्क्यांपर्यंत व्याजदर गुंतवलेल्या पैशांवर मिळतो. दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीवर जोखीम अत्यंत कमी आहे. ३१ मार्च २०२० साली सरकार ही योजना बंद करण्याच्या विचारात होते, मात्र, योजनेची प्रसिद्धी पाहता ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मुदत ठेवींपेक्षा चांगला परतावा या योजनेतून मिळतो. त्यापेक्षा ही योजना जास्त परतावा देते.
विमा कंपन्यांच्या अॅन्युईटी योजनांमधील गुंतवणूक
जीवन विमा महामंडाळकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अॅन्युईटी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. जीवन अक्षय आणि न्यू जीवन शांती ह्या योजना प्रामुख्याने आहेत. या योजनांमध्ये एकरकमी किंवा टप्प्याटप्याने पैसे गुंतवता येतात. निवृत्तीनंतर गुंतवणूकीवरील व्याज मासिक, तिमाही किंवा वार्षिक पद्धतीने काढू शकता. इमिडिएट अॅन्युइटी आणि डिफर्ड अॅन्युइटी असे या योजनांचे दोन प्रकार आहेत. जी व्यक्ती निवृत्तीच्या जवळ आली आहे ती व्यक्ती एकाच मोठी रक्कम या योजनेत गुंतवू शकते. निवृत्तीनंतर महिन्याला त्यातून व्याज मिळेल. डिफर्ज अॅन्युइटी योजनेनुसार कमावत्या वयात थोडी-थोडी रक्कम जमा करत गेल्यास निवृत्तीनंतर व्याजाच्या रुपाने परतावा मिळेल. यामध्ये योजनांचे अनेक प्रकार आहेत. याची सविस्तर माहिती घेऊन गुंतवणूक करू शकता.
सरकारी रोखे
सरकारी बाँडमधील गुंतवणूक ही सुद्धा निवृत्तीनंतर उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. सरकारी रोखे सुरक्षित मानले जातात. यातून तुम्हाला साडेसहा ते सात टक्क्यांच्या दरम्यान व्याजदर मिळू शकतो. सरकारी बाँडमधील गुंतवणूकीतून सहा महिन्यानंतर तुम्हाला व्याज मिळेल. दीर्घ काळासाठी निश्चित उत्पन्न हवे असल्यास सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक हा पर्याय योग्य आहे.