एप्रिल महिन्याची म्युच्युअल फंडाची आकडेवारी पाहिल्यास इक्विटी प्रकारात जवळपास 70 टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. 6,480 कोटी रुपये इतकी घसरण झाली होती. दुसरीकडे, स्मॉल कॅप फंडांवर मात्र गुंतवणूकद खूश असल्याचं दिसतं. एएमएफआयच्या (AMFI) डेटानुसार, मागच्या महिन्यात (एप्रिल) स्मॉलकॅप फंडांमध्ये 2,182 कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह होता. इक्विटी प्रकारातली ही सर्वाधिक गुंतवणूक असल्याचं दिसतं. 2023च्या पहिल्या तिमाहीचा विचार केल्यास या प्रकारात एकूण 6,932 कोटी रुपयांचा प्रवाह नोंदवलाय. स्मॉल कॅपशिवाय मिड कॅपमध्येही चांगली गुंतवणूक झालेली पाहायला मिळाली. एप्रिलमध्ये या प्रकारात 1,790 कोटी रुपयांची गुंतवणूक आली.
'स्मॉलकॅप कंपन्यांची कामगिरी चांगली'
स्मॉल कॅप फंडांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढलाय. याबद्दल बजाज कॅपिटलच्या समूह संचालक अनिल चोप्रा यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, की नवीन रिटेल गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात येत आहेत. एसआयपीच्या माध्यमातून ते बाजारात गुंतवणूक करतात. मॅच्युरिटीच्या अभावामुळे ते कोणत्याही फंडाच्या मागच्या परफॉर्मन्सवर अधिक लक्ष केंद्रित करतात. स्मॉल कॅप कंपन्यांची चांगली कामगिरी त्यांना आकर्षित करतेय.
तुलनात्मक टक्केवारी
स्मॉल कॅप फंडांचं आकर्षण वाढण्याची अनेक कारणं आहेत. विविध प्रकारच्या गुंतवणुकीतला परतावा पाहिल्यास स्मॉल कॅपच्या प्रतिसादाचा अंदाज येतो. लार्जकॅपचा परतावा 25 टक्के, मिड कॅपचा परतावा 32 टक्के आणि स्मॉल कॅपचा परतावा सुमारे 42 टक्के इतका आहे. गेल्या 5 वर्षात स्मॉल कॅपचं मार्केट कॅप दुप्पट झालंय. 2017मध्ये ते 8,580 कोटींवरून 2022मध्ये 16,500 कोटींपर्यंत वाढलंय. आनंदाथी वेल्थ लिमिटेडच्या म्युच्युअल फंडाच्या प्रमुख श्वेता राजानी यांनी सांगितले, की आजपर्यंत एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप 16,500 कोटी रुपयांपर्यंत असेल तर ते स्मॉल कॅप प्रकारात ते येतं.
'हे' लक्षात ठेवा
- स्मॉल कॅप प्रकारात 3,000 कोटींपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या 400 कंपन्या आहेत. या कंपन्यांची कामगिरी चांगली आहे. फंड मॅनेजर या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतात. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीसाठी या फंडांमध्ये गुंतवणूक करावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.
- 10-15 वर्षांच्या उद्दिष्टांसाठी स्मॉल कॅप फंड निवडले जाऊ शकतात. या फंडांमध्ये अस्थिरतेचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चलाखीनं गुंतवणूक करावी.
- कमी काळात स्मॉल कॅप्समध्ये मोठी अस्थिरता असते. अशा परिस्थितीत या अस्थिरतेमुळे घाबरून जाण्याची आणि नुकसान करण्याची गरज नाही.
- चांगल्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप फंडामध्ये जास्तीत जास्त 20 टक्के गुंतवणूक करावी. 80 टक्के लार्जकॅप आणि मिड कॅप फंडांमध्ये गुंतवायला हवे
- स्मॉल कॅप फंड तुम्हाला मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात, परंतु त्यात धोका अधिक आहे. अशास्थितीत गुंतवणूकदारांनी जास्त परतावा मिळवण्याच्या लालसेनं केवळ स्मॉल कॅप फंडांवर लक्ष केंद्रित करू नये.