गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जोखीम (Risk) पत्करण्याची इच्छा नाही, असे गुंतवणूकदार प्रामुख्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक अधिकार मिळत असतात. या अधिकारांबद्दल आपण अधिक जाणून घेऊ.
Table of contents [Show]
स्कीमची कागदपत्रे मागवणे (Scheme Documents)
गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रे गुंतवणूकदार मागवू शकतो. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India-SEBI), म्हणजेच सेबीने गुंतवणूकदारांसाठी काही हक्क दिले आहेत. गुंतवणूकदार त्याने गुंतवणूक केलेल्या स्कीम संदर्भातील सर्व कागदपत्रे तसेच स्कीमबाबतची सर्व माहिती ग्राहक मागवू शकतो. ज्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे; त्या स्कीममध्ये संबधित कंपनीने काही बदल केले असतील तर त्याची माहिती गुंतवणूकदारांना देणे गरजेचे आहे.
कमिशन आणि चार्जेस (Commission & Charges)
गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये थेट किंवा एखाद्या अधिकृत मध्यस्थांमार्फत (Distributor) गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीबद्दल डिस्ट्रीब्युटरला किती कमिशन मिळाले याची माहिती संबंधित कंपनीला मागता येते. तसेच गुंतवणुकीवर डिस्ट्रीब्युटरकडून काही शुल्क (Charges) आकारले गेले असतील तर ते चार्जेस किती आहेत, याची माहिती गुंतवणूकदाराला मागता येते. हे चार्जेस आकारताना डिस्ट्रीब्युटरकडून जास्त चार्जेस आकारले जात असल्याची शंका तुमच्या मनात आल्यास तुम्ही त्याबाबतची माहिती कंपनीकडून मागवू शकता.
प्रत्येक महिन्याचा परफॉर्मन्स ई-मेलवर
फंड हाऊस (Mutual Fund House)कडून गुंतवणूकदाराला स्कीम संदर्भातील सर्व माहिती ई-मेलव्दारे दिली जाते. त्याचबरोबर म्युच्युअल फंड्स असोसिएशनव्दारे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीबाबतची सर्व माहिती ई-मेलने प्रत्येक महिन्याला पाठवली जाते. गुंतवणूक केलेल्या फंड हाऊसमध्ये गुंतवणूकदाराचे पॅन कार्ड (Pan Card) रजिस्टर्ड असल्यामुळे फंड हाऊसमधूनही गुंतवणूकीविषयीची सर्व माहिती मिळवू शकते.
विलंबावर व्याज मागण्याचा अधिकार (Right to Demand Interest on Delay)
जर तुम्ही म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रोसेस फॉलो केली. पण तरीही 10 दिवसांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर तुम्ही संबंधित कंपनीकडून त्या पैशांवर व्याजाची मागणी करु शकता. फंड हाऊसकडून पैसे जमा होण्यास जेवढा विलंब लागेल त्या कालावधीवर व्याज मागण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला आहे. हाच नियम लाभांशाबाबतही लागू आहे. तसेच गुंतवणुकीवरील लाभांश 30 दिवसांच्या गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा न झाल्यास संबधित कंपनीकडून व्याजाची मागणी करु शकता.
ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र (Customer Grievance Cell)
सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी यंत्रणा (customer grievance cell) कार्यरत असते. म्युच्युअल फंड कंपनीच्या कारभाराबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही त्या कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे तक्रार नोंदवू शकता. जर तुमच्या तक्रारीचे संबधित कंपनीकडून निराकरण झाले नाही, तर गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड असोसिएशनकडे (Mutual Fund Association of India) दाद मागता येते. म्युच्युअल फंड असोसिएशनने दिलेल्या मुदतीत तक्रारीचे निराकरण केले नाही तर गुंतवणूकदाराला त्या कंपनीविरोधात सेबीकडे तक्रार करता येते.