चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे आपण शाळेत असताना शिकलो आहोत. परंतु जेव्हा कमावते झालो, चार पैसे कमवायला लागलो तेव्हा मात्र हे चक्रवाढ व्याज आणि त्याचे फायदे मात्र विसरलो असे काहीसे चित्र आपल्याला आजकाल पाहायला मिळते आहे. यासाठी आवश्यकता आहे ती पुन्हा ‘चक्रवाढ व्याज म्हणजे काय?’ हे समजून घेण्याची. चला तर मग आज समजून घेऊयात हे चक्रवाढ व्याज नेमके आहे काय आणि याचा दीर्घकालीन लाभ कसा मिळवता येईल.
‘चक्रवाढ’ ही फायनान्समधील एक अतिशय महत्वाची अशी संकल्पना आहे जी तुमच्या मुद्दल गुंतवणुकीवर तसेच त्यावर जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळवण्याची सुविधा देते. यामुळे तुमच्या मुद्दल गुंतवणूकीवर आणि त्यावर मिळालेल्या व्याजावर व्याज मिळाल्याने दिर्घकालीन गुंतवणुकीत तुम्हांला मोठा फायदा होतो.
हे सगळे समजून घेण्यासाठी जरा विस्ताराने आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर काही ना काही परतावा मिळतो. चक्रवाढ करून, तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवरच परतावा मिळवत नाही तर कमावलेल्या व्याजावरही परतावा मिळवता. याचाच अर्थ तुमच्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज पुन्हा गुंतवले जाते आणि पुढील कालावधीचे व्याज तुमची मुद्दल आणि जमा झालेल्या व्याजावर मिळते. हे चक्र असेच चालू राहते, परिणामी कालांतराने तुमच्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होते. समजायला थोडं अवघड वाटतंय? काळजी करू नका, आणखी सोप्या भाषेत हे समजावून घेऊयात.
उदाहरणार्थ, तुम्ही 5% वार्षिक व्याजदराने 1,000 रुपयांची गुंतवणूक करता असे समजा. गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षानंतर, तुम्ही व्याज म्हणून 50 रुपये मिळवाल. आता तुम्हांला मिळालेले 1050 रुपये पुन्हा 5% वार्षिक व्याजदराने गुंतवले जातील. यावर दुसऱ्या वर्षात तुम्हांला 52.50 रुपये इतके व्याज मिळेल.हे 1,102.50 रुपये जेव्हा तुम्ही तिसऱ्या वर्षासाठी गुंतवाल तेव्हा तुम्हांला 5% वार्षिक व्याजदराने 55.13 रुपये मिळतील.म्हणजे बघा, तुम्हांला केवळ तुमच्या मुद्दल गुंतवणुकीवर व्याज न मिळता तुमच्या व्याजावर देखील व्याज मिळवण्याची सुविधा या चक्रवाढ व्याजदरात असते. पैशाने पैसा वाढतो, असं उगाचच म्हणत नाही!
जितकी जास्त बचत, तितका जास्त परतावा
तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका तुम्हांला यात परतावा मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक करणे, बचत अधिक करणे या सगळ्या गोष्टी तुम्हांला चक्रवाढ व्याजाचा अधिक फायदा मिळवून देऊ शकतात. विशेषत: दीर्घ कालावधीसाठी चक्रवाढीचा मोठा फायदा बघायला मिळतो.
चक्रवाढ व्याज मिळवण्यासाठी गुंतवणूक पर्याय
भारतात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत जे चक्रवाढ व्याज देतात. यातील काही पर्याय खालीलप्रमाणे:
मुदत ठेवी (FDs): Fixed Deposit हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे जो चक्रवाढ व्याज देतो. बँका आणि इतर वित्तीय संस्था FD ऑफर करतात.काही ठराविक दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी देखील तुम्ही मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकता. लक्षात असू द्या, जितका गुंतवणुकीचा कालावधी अधिक, तितका परतावा अधिक.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): Public Provident Fund हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो चक्रवाढ व्याज देतो. चक्रवाढ व्याज मिळवण्याचा हा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्याय आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या गुंतवणूक योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे, त्यामुळे परतावा देखील अधिकच मिळतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC): National Saving Certificate हा आणखी एक गुंतवणूक पर्याय आहे जो चक्रवाढ व्याज देतो. त्याचा लॉक-इन कालावधी 5 किंवा 10 वर्षांचा असतो.
आवर्ती ठेवी (RDs): Recurring Deposit हा मुदत ठेवीचा आणखी एक लोकप्रिय प्रकार आहे जेथे गुंतवणूकदार विशिष्ट कालावधीसाठी दर महिन्याला निश्चित रक्कम जमा करू शकतात. या गुंतवणूक योजनेत दर तीन महिन्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज दिले जाते.
डेट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund): म्युच्युअल फंड स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजच्या विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतात. अनेक म्युच्युअल फंड लाभांश आणि भांडवली नफा पुन्हा गुंतवण्याचा पर्याय देतात, ज्यामुळे चक्रवाढ व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana): SSY ही मुलींसाठी असलेली एक सरकारी योजना आहे जी चक्रवाढ व्याज देते. योजनेचा लॉक-इन कालावधी 21 वर्षे किंवा मुलीचे लग्न होईपर्यंत आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला मोठा परतावा मिळतो.
यापैकी कोणत्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सादर योजनेतील व्याजदर, कालावधी आणि जोखीम यासारख्या घटकांचा विचार करणे देखील आवश्यक आहे. सोबतच, गुंतवणूकदारांनी कोणतेही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी त्यांची आर्थिक उद्दिष्टे विचारात घेतले पाहिजेत.