Post Office Scheme: गुंतवणूक योजनांचा विचार केला तर त्यात प्रामुख्याने सरकारी योजनांमधील पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनांना सर्वाधिक प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते. पोस्टाच्या योजनांमध्ये कोणतीही जोखीम नसून त्यावर सरकारकडून निश्चित व्याज मिळत असल्यामुळे या योजनांना गुंतवणूकदारांकडून पसंती मिळते.
तुम्ही सुद्धा गुंतवणुकीच्या विविध योजना पाहत असाल आणि तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल तर, पोस्टाची अल्प बचत योजनेतील रिकरिंग डिपॉझिट योजना (Post Office Recurring Deposit Scheme) फायद्याची ठरू शकते. केंद्र सरकारकडून या अल्प बचत योजनांवरील व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. नुकत्यात झालेल्या आढावा बैठकीत सरकारने रिकरिंग डिपॉझिट योजनेवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंटने वाढ केली.
रिकरिंग डिपॉझिटवर 6.7 टक्के व्याजदर
केंद्राच्या अर्थ विभागाने प्रसिद्ध केलेल्या नोटीफिकेशननुसार, पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात 20 बेसिस पॉईंटने वाढ केली. या योजनेवर यापूर्वी 6.5 टक्के व्याज दिले जात होते. ते आता 1 ऑक्टोबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत 6.7 टक्के दिले जाणार आहे. या योजनेवर दर तीन महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते.
किमान गुंतवणूक 100 रुपयांपासून
पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. ही योजना जोखीममुक्त योजना मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनांना सॉवरीन गॅरंटी असते. म्हणजे त्याची संपूर्ण जबाबदारी सरकार घेत असतं. त्यामुळेच यावर मिळणारे व्याज हे निश्चित असते आणि सुरक्षित असते.
रिकरिंग डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली. तर त्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 5 वर्षांनी 56,830 रुपये निश्चित व्याज मिळेल. म्हणजेच गुंतवणूकदाराला 5 वर्षांनी एकूण 3 लाखांच्या गुंतवणुकीवर 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळतील. तसेच ही गुंतवणूक 5 वर्षांनी आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येते. त्यावर 10 वर्षांत तुम्हाला एकूण 8 लाख 54 हजार रुपये मिळतील. त्यातील अडीच लाख रुपये हे व्याजातून मिळणारे निश्चित उत्पन्न असणार आहे.