वाढता वैद्यकीय खर्च पाहता प्रत्येकाने आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. तुम्ही देखील स्वतःचा व कुटुंबाचा आरोग्य अथवा जीवन विमा काढला असेल. भविष्यात येणाऱ्या आर्थिक समस्यांचा सामना करणे शक्य होईल, या उद्देशाने अनेकजण विमा काढतात. मात्र, दावा केल्यावर ऐनवेळी विमा कंपन्या पैसे देणे टाळतात. विम्यासंदर्भातील नियम व अटींमुळे ग्राहक देखील गोंधळून जातात. मात्र, आता विमाधारकांना विम्यासंदर्भातील सर्व माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडाने (IRDAI) विमा कंपन्यांना ग्राहकांना सोप्या भाषेत विम्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत. याबाबतचा नियम लवकरच लागू होणार आहे.
विमा नियमात कोणते बदल होणार?
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडाने विमा कंपन्यांना सर्व विमाधारकांसाठी कस्टमर इंफॉर्मेशन शीट (CIS) जारी करण्यास सांगितले आहे. कस्टमर इंफॉर्मेशन शीटमध्ये विमाधारकांशी संबंधित सर्व माहिती असते. मात्र, अनेकदा किचकट प्रक्रियेमुळे विमाधारकांना विम्याबाबतच्या सर्व अटी व नियम लक्षात येत नाही. ग्राहकांना सोप्या भाषेत विम्याची माहिती मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, ग्राहकांना विम्यासंदर्भातील सर्व माहिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विमाधारकाने एखादी पॉलिसी न आवडल्यास ठराविक कालावधीच्या आत ती विमा पॉलिसी रद्द देखील करता येईल.
कस्टमर इंफॉर्मेशन शीटमध्ये (CIS) कोणत्या गोष्टींचा समावेश असेल?
विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहकांना कस्टमर इंफॉर्मेशन शीट दिली जाते. CIS मध्ये पॉलिसीचा प्रकार व त्याचे फायदे, पॉलिसी नंबर, पॉलिसींतर्गत समावेश असलेल्या गोष्टी, पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही, क्लेमची प्रक्रिया व पॉलिसीचा कालावधी इत्यादी माहिती उपलब्ध असेल.
नवीन नियमाचा ग्राहकांना कसा होईल फायदा?
विम्यासंदर्भातील अटी व नियम हे किचकट असतात. त्यामुळे विमाधारकांना क्लेम केल्यानंतर विम्याची रक्कम मिळण्यास अडचणी येतात. मात्र, CIS मुळे किचकट प्रकिया व अटी समजण्यास सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. अनेकदा विमाधारक व विमा कंपन्यांच्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने वाद निर्माण होतात. परंतु, CIS मुळे वाद कमी होऊन दावे जलदगतीने निकालात काढता येतील. विमाधारकांना सोप्या भाषेत सर्व माहिती मिळावी यासाठी कस्टमर इंफॉर्मेशन शीट स्थानिक भाषेत देखील उपलब्ध असेल.