संपत्तीत स्त्रियांना देखील समान वाटा असतो असे राज्यघटनेत नमूद केले गेले आहे. वारसाहक्काने येणारे हक्क आणि अधिकार जितके मुलाला लागू आहेत तितकेच मुलीला देखील लागू आहेत. लग्न झाल्यानंतर देखील मुलीचे वारसा हक्क अबाधित राहतात हे न्यायलयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयातून सांगितलेले आहे.
- वडिलांच्या मालमत्तेत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान वाटा दिला जाईल.
- मुलगी विवाहित असली किंवा नसली, त्याचा कुठलाही परिणाम वारसा हक्कावर होत नाही.
- वडिलांनी स्वकष्टाने कमावलेल्या मिळकतीवर मुलीचा समान अधिकार असेल. परंतु मृत्युपत्रात अथवा इच्छापत्रात कोणा विशिष्ट व्यक्तीला संपत्ती देण्याच्या सूचना केल्या असल्यास त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात
- पती-पत्नी वेगवगळे रहात असले किंवा घटस्फोटीत असले तरीही वारसा हक्कानुसार पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क असतो.
- वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळण्याशी तिचा पुनर्विवाह, घटस्फोट, वैधव्य या बाबींचा अडथळा येत नाही. मुलीने आंतरजातीय विवाह केला असला तरीही तिचे अधिकार अबाधित राहतात.
- विधवा सून अथवा पत्नीने पुनर्विवाह केला असला तरीही तिचे वारसा हक्क अबाधित राहतात. तिच्या वारसा संपत्तीचे काय केले जावे याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते. तिच्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही.
स्त्रीधनावर केवळ स्त्रीचा अधिकार!
हा शब्दच मुळी स्त्रियांच्या धनाशी जोडलेला आहे. हे धन स्त्रीला तिच्या जन्मापासून वारसा हक्काद्वारे, बक्षिसपत्राद्वारे किंवा कायदेशीर भेट अशा अनेक मार्गानी मिळालेले असू शकते. स्त्रीधनावर कोणाचाही अधिकार नसतो. स्त्रीधन स्त्रीला वारसा हक्काने, वाटणीमध्ये, विवाहापूर्वी, विवाहाचे वेळी व विवाहानंतर नातलग व इतर सासर-माहेरच्या व्यक्तींकडून मिळालेल्या भेटवस्तू, बक्षीस, मालमत्ता इ. स्वरूपात असू शकते. विवाहाचे वेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिला घातलेले दागिने देखील तिचे स्त्रीधन असते. महिलेने स्वत: कमावलेली संपत्ती/मालमत्ता आणि स्त्रीधन परत करण्यास सासरचे लोक तयार नसतील तर त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.
हक्कसोडपत्र काय आहे?
माहेरच्या संपत्तीवर स्त्रीने हक्क सांगू नये म्हणून अनेकदा महिलांकडून हक्कसोडपत्रावर सह्या घेतल्या जातात. नात्यांमध्ये दुरावा नको म्हणून अनेकदा स्त्रीया देखील हक्कसोडपत्र देत असतात. असे असले तरीही स्वतःच्या संपत्तीशी संबंधित हक्कसोडपत्र, कुलमुखत्यार पत्र किंवा पावर ऑफ एटर्नी असल्या कुठल्याही दस्तऐवजावर सह्या करताना वकिलांचा आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. स्त्रियांनी आपले कायदेशीर अधिकार समजून घेऊनच अशा कागदपत्रांवर सही करावी.
वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे
भारतात अनेक जातीधर्माचे लोक राहतात. त्यांचे रीतीरिवाज, नियम, धार्मिक नीतीनियम देखील निरनिराळे आहेत. हिंदू, मुस्लीम , ख्रिश्चन धर्मातील महिलांना त्या त्या धर्मातील मान्यतेनुसार हक्क अधिकार मिळतात. इस्लामिक कायद्यानुसार देखील महिलांना वारसा हक्काने संपत्तीत हक्क मागतो येतो. मुस्लीम धर्मात स्त्रीधन ही संकल्पना नसली तरीही ‘मेहेर’ ही संकल्पना आहे. लग्नाच्या वेळी नवऱ्याने सर्वसंमतीने मुलीला एक रक्कम द्यावी लागते. यावर केवळ त्या महिलेचाच अधिकार असतो. ख्रिश्चन धर्मातील महिलांना देखील वारसा हक्काने संपत्तीचा अधिकार आहे, परंतु संपत्ती वाटपाचे गुणोत्तर वेगळे आहे. पतीच्या मृत्यूपश्चात संपत्तीत पत्नीला ½, मुलांना ⅔ हिस्सा मिळतो तर उरलेला हिस्सा इतर नातेवाईकांना (आई, वडील, बहिण) मिळतो. मूल जर नसेल तर पतीच्या मृत्युपश्चात पत्नी आणि नातेवाईक यांच्यात समसमान विभागणी होते.