टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पदमविभूषण रतन टाटा यांचा महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्काराने गौरव केला. आज शनिवारी 19 ऑगस्ट 2023 रोजी रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा यांना सन्मानित केले. टाटा यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपयांटे धनादेश देऊन गौरवण्यात आले.
राज्य सरकारने या वर्षीपासून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.
मीठापासून विमान सेवेपर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहाचे भारतीय उद्योगात भक्कम योगदान आहे. या उद्योग समूहाने 100 देशांत विस्तार केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 नुसार टाटा समूहाची एकूण उलाढाल 128 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
रतन टाटा आणि टाटा समूहाचे भारतातील उद्योग क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगे आहे. राज्यासाठी रतन टाटा एक रत्ना प्रमाणेच आहेत. त्यांनी राज्य सरकारचा पुरस्कार स्वीकारला याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांना धन्यवाद दिले.
टाटा यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरस उद्योग विभागाचे हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर आदी उपस्थित होते.