सुमित नागल "एटीपी सिंगल रैंकिंग" मध्ये 159 व्या स्थानावर आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नागल यांनी आपली व्यथा मांडली; नागल म्हणाले, "माझ्याकडे बचतीच्या नावावर काहीही नाही आणि मी आर्थिकदृष्ट्या खचत चाललो आहे. गेल्या दोन वर्षांत मी जास्त काही कमावले नाही ज्यामुळे मी चांगले जीवन जगण्यासाठी असमर्थ आहे."
ATP टूर खेळण्यासाठी केला प्रचंड खर्च
एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी नागलला तब्बल एक कोटी रुपये मोजावे लागले. यासाठी त्याने बक्षिसाची सर्व रक्कम, IOCL तर्फे मिळणारा पगार आणि महा टेनिस फाउंडेशनकडून मिळालेली मदत खर्च केली. खेळाडूंचा हा खर्च सराव केंद्रातील त्यांच्या मुक्कामावर आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी होतो. ही रक्कम जमा केल्यानंतर नागलला त्याचा आणि कुटुंबाचा खर्च भागविणे देखील कठीण झाले आहे.
दरवर्षी एक कोटी रुपयांचा खर्च
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना नागल म्हणाले की, माझ्या बँकेत सध्या 900 युरो (जवळपास 79,000 रुपये) फक्त येवढीच रक्कम शिल्लक आहे. एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी माझा वार्षिक खर्च सुमारे 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे. पण माझ्याकडे सध्या कोणताही मोठा प्रायोजक (Sponsor) नाही. मला काही प्रमाणात मदत मिळाली आहे, महा टेनिस फाउंडेशनचे प्रशांत सुतार मला मदत करत आहेत आणि मला IOCL कडून मासिक (पगार) देखील मिळतो. पण हे सर्व माझा एटीपी टूरमध्ये होणारा खर्च भागविण्यासाठी पुरेसे नाही.
नागलने यावर्षी 24 टूर्नामेंट मध्ये भाग घेतला, ज्यातून त्याला अंदाजे 65 लाख रुपये मिळाले. त्याची सर्वात मोठी जिंकलेली बक्षीसाची रक्कम "यूएस ओपनमधून" आली जिथे तो पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला, परंतु तरीही त्याला US$ 22000 (सुमारे 18 लाख रुपये) मिळाले.
पैसे नसल्याने 3 महिन्यांपासून जर्मनीमध्ये सराव
नागल गेल्या काही वर्षांपासून जर्मनीतील नॅन्सेल टेनिस अकॅडीमीमध्ये सराव करत होता, परंतु निधीच्या कमतरतेमुळे तो 2023 हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांत त्याच्या आवडत्या ठिकाणी सराव करू शकला नाही. त्याचे मित्र सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्क्विस यांनी त्याला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मदत केली होती.