इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आजची शेवटची तारीख (31 जुलै) आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माहितीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात रविवारी 30 जुलैपर्यंत 6 कोटींहून अधिक रिटर्न भरण्यात आला आहे. तर रविवारी संध्याकाळी 27 लाख ITR रिटर्न भरला आहे. तर ज्यांनी अजून भरला नाही ते भरण्याच्या तयारीत आहेत. पण, या सर्वांत तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की सर्वाधिक इन्कम टॅक्स कोण भरत असेल? अन् तुमच्या मनात अंबानी-अदानी, टाटा-बिर्ला यांची नाव नक्कीच येत असतील. यात काही नवलही नाही. पण, या यादीत बाजी मारली आहे ती बाॅलीवुडच्या सुपरस्टार अक्षय कुमारने.
कमाईच्या सोर्सची नाही कमी
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षात म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षात अक्षय कुमारने सर्वाधिक टॅक्स भरला आहे. 2022 या आर्थिक वर्षात त्याने 486 कोटी रुपयांची कमाई केली असून त्याने 29. 5 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. अक्षय कुमारचा नंबर सर्वाधिक पैसे घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये लागतो. गेला बाजार तो दरवर्षी 4 ते 5 चित्रपट करतोच. याचबरोबर त्याचं स्वत:चं प्राॅडक्ट हाऊस आणि स्पोर्ट टीमही आहे. तसेच, त्याला इतर ब्रॅंडकडूनही बऱ्यापैकी पैसा मिळतो. त्याने 2021 मध्येसुद्धा 25.5 कोटी टॅक्स भरला होता. तेव्हासुद्धा त्याचा नंबर टाॅपवरच होता. कारण, त्याचे कमाईचे सोर्स भरपूर आहेत. त्यामुळेच, तो वैयक्तिक टॅक्स भरण्याच्या यादीत गेल्या दोन वर्षांपासून अव्वलच आहे.
अंबानी-अदानी भरतात काॅर्पोरेट टॅक्स!
तुम्हाला वाटत असेल भारतात तर अक्षय कुमारहून खूप श्रीमंत लोक आहेत. यामध्ये अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांचं नाव का नाही? असं वाटणं साहजिक आहे. पण, पाहायला गेल्यास कंपनीची संपत्ती त्यांच्या नावावर नसते, ती कंपनीच्या नावावर असते. त्यामुळे त्यांची कमाई कंपनीलाच जाते आणि त्याच्या बदल्यात काॅर्पोरेट टॅक्स भरला जातो. आता या यादीत यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.