गेल्या काही वर्षांपासून देशात UPI पेमेंट ही एक साधारण बाबा बनली आहे. एवढचं नाही तर तर गेल्या आर्थिक वर्षात भारतात थोडेथोडके नाही तर तब्बल 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहार नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या पहिल्या पाच देशांच्या यादीत भारताने पहिला क्रमांक नोंदवला आहे हे विशेष! परंतु यासोबतच आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीयांचा डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे असा एक अहवाल समोर आला आहे.
एप्रिल 2023 मध्ये भारतात क्रेडिट कार्डद्वारे 25 कोटी व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 22 कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. डेबिट कार्डद्वारे 53,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत तर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल 1.33 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.
क्रेडीट कार्डचा वापर 20% वाढला
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI द्वारे पेमेंट करताना भारतीय ग्राहक आता डेबिट कार्डचा वापर कमी करू लागले आहेत. गेल्या वर्षी क्रेडिट कार्ड स्वाइप करून पेमेंट करण्याच्या संख्येत 20% वाढ नोंदवली गेली आहे. तर दुसरीकडे डेबिट कार्ड स्वाइप करून पेमेंट करण्याच्या संख्येत 31%घट नोंदवली गेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी देशभरात 10 दशलक्ष क्रेडिट कार्ड युजर्स वाढले आहेत. चालू आर्थिक वर्षात देशात 85 दशलक्ष क्रेडिट कार्ड युजर्स आहेत तर मागील वर्षी ही संख्या 75 दशलक्ष इतकी होती.
क्रेडिट कार्डचा वापर चांगला की वाईट?
क्रेडिट कार्ड तुम्ही कसे वापरता यावर खरे तर हे अवलंबून आहे. खरे तर भारतीय मानसिकता ही पैशाची बचत करणे अशीच आहे. कर्ज घेऊन पैसे खर्च करणे ही सवय भारतीयांना अजून तरी लागलेली नाही. मात्र क्रेडिट कार्डचे वाढते युजर्स बघता क्रेडिट कार्ड धारकांना अर्थसाक्षर करणे गरजेचे आहे असे काही जाणकार सांगतात.
खरे तर क्रेडिट कार्डमुळे ऑनलाइन खरेदी वाढली आहे. पैसे नसताना निकडीच्या वस्तू खरेदी करणे आता क्रेडिट कार्डमुळे सहजशक्य झाले आहे. भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर वाढण्याचा प्रयत्न देखील काही लोक करताना दिसतात. एक आपत्कालीन निधी म्हणून देखील क्रेडिट कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.
मात्र त्याचे काही संभाव्य तोटे देखील आहेत. क्रेडिट कार्ड जबाबदारीने वापरले नसल्यास, कर्जाचा भार वाढत जातो हेही लक्षात घ्या. क्रेडिट कार्ड आहे म्हणून अनावश्यक खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासोबत देखील असा काही प्रकार घडलाच असेल. काही क्रेडिट कार्ड्सवर वार्षिक शुल्क भरावे लागते, उशीरा पेमेंट केल्यास त्यावर दंड किंवा उच्च-व्याज दर भरावे लागतात. त्यामुळे जर आर्थिक साक्षरता नसेल, खर्चाचे नियोजन नसेल तर क्रेडिट कार्ड न वापरलेलेच बरे!