Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Startups: गेल्या आर्थिक वर्षात स्टार्टअपची भरभराट, 1.4 अब्ज डॉलर्सची झाली गुंतवणूक

Start Up In India

एका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे.

Startups in India: गेल्या काही वर्षांत भारतात स्टार्टअप उद्योगांना चालना मिळावी यासाठी सरकारतर्फे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. स्टार्टअप उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुद्रा लोन (MUDRA Loan) नावाने एक विशेष योजना देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक युवा उद्योजकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. तसेच गुंतवणूक मिळवण्यात देखील अनेक स्टार्टअप यशस्वी ठरले आहेत.

स्टार्टअप उद्योगांसाठी गेले आर्थिक वर्ष सकारात्मक ठरले. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 1.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. शेवटच्या तिमाहीमधील गुंतवणूक संपूर्ण आर्थिक वर्षातील गुंतवणुकीतील सर्वाधिक गुंतवणूक होती हे विशेष!

युवरस्टोरीने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे. साहजिकच यातून होणाऱ्या रोजगार निर्मितीचा फायदा देखील सुशिक्षितांना होणार आहे.

स्टार्टअप उद्योगांना गुंतवणुकीचे पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असताना दुसरीकडे व्हेंचर फंडिंगमध्ये मार्च 2023 पर्यंत जवळपास 52 टक्के पर्यंत घसरण झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

स्टार्टअप कंपन्या आपली बाजारपेठ आगोदरपासूनच ठरवून त्यानुसार उद्योगधंदे निर्माण करतात. झटपट सुविधा आणि झटपट आर्थिक लाभ हे या उद्योगाचे मुख्य वैशिष्ट्य असते. तर दुसरीकडे व्हेंचर कंपन्या या मोठ्या स्वरूपात काम करतात आणि दीर्घकालीन आर्थिक धोरणे घेऊन कार्यरत असतात.

अहवालानुसार लेन्सकार्ट (Lenskart), फोन पे (PhonePe), मिंटीफाय (Mintifi) आणि स्टॅशफिन (Stashfin) या कंपन्यांनी मार्च अखेरपर्यंत 100 मिलियन डॉलर आणि त्याहून अधिक गुंतवणूक प्राप्त केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात स्थिरस्थावर झालेल्या स्टार्टअप कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचे दिसते आहे.

शहरे आणि स्टार्टअप्स!

अहवालानुसार देशभरातील स्टार्टअप कंपन्यांचा विचार करता दिल्ली-एनसीआर (Delhi NCR) भागातील स्टार्टअप कंपन्यांना सर्वाधिक गुंतवणूक प्राप्त झाली आहे. या शहरातील स्टार्टअपला सुमारे 734 दशलक्ष डॉलर्सची सर्वाधिक गुंतवणूक मिळाली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आयटी हब समजल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहराचा नंबर आहे. या शहरातील स्टार्टअप्सला 283 दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक मिळाली आहे. बेंगळुरूमध्ये सर्वाधिक आयटी कंपन्या असून, आयटी विषयासंबंधित सर्वाधिक स्टार्टअप याच शहरांत आहेत. अनेक स्टार्टअप आयटी विषयी सुविधा देण्यासाठी काम करताना दिसतात. आयटी विषयीचे मार्केट, मागणी आणि व्यवसाय यांचा विचार करता भारतात यासंबंधी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. बेंगळुरूला स्टार्टअप्सची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते.

top-three-cities-funded.jpg

स्टार्टअप्सला गुंतवणूक मिळवण्यात तिसऱ्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात मुंबईतल्या स्टार्टअप्सला 218 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

उद्योग क्षेत्रांचा विचार केला असता, ईकॉमर्स क्षेत्राला सर्वाधिक 521 दशलक्ष डॉलर्सचा निधी प्राप्त झाला आहे. त्या खालोखाल फिनटेक कंपन्यांना 469 दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

आर्थिक मंदीचे सावट आणि रोजगाराच्या संधी

जगभरात आर्थिक मंदीचे सावट दिसत असताना त्याचा परिणाम थोड्या बहुत प्रमाणात भारतात देखील दिसतो आहे. मोठमोठ्या कंपन्यानी कर्मचारी कपात चालवली असताना भारतीय स्टार्टअप्स मात्र कर्मचारी भरती करताना दिसतायेत. सुशिक्षित तरुणाई देखील व्यवसाय म्हणून स्टार्टअप्सचा पर्याय निवडत आहेत. स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढत असल्यामुळे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत.