टू-व्हीलर (Two Wheeler) किंवा दुचाकी हे मध्यमवर्गीयांचं वाहन आहे. आणि भारत ही त्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे. देशातली सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्मिती कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ही या सेगमेंटमधली जगातली सर्वात मोठी कंपनी आहे. देशातला अलीकडचा टू-व्हीलर खरेदीचा ट्रेंड बघितला तर शहरांपेक्षा ग्रामीण भागात त्यांची विक्री वाढलीय. आणि महत्त्वाचं म्हणजे खरेदीदार महिला आणि तरुण वर्ग आहे. तरुणांचा ओढा अर्थातच स्टायलिश बाईक्सकडे आहे. आणि महिलांची पसंती आहे स्कूटर्सना.
ही आकडेवारी CIRF हायमार्क या संस्थेनं दिली आहे. त्यांनी दोन निरीक्षणं मांडली आहेत. एक म्हणजे टू-व्हीलर सेगमेंटमधली कर्जंही वाढतायत . आणि ती घेणाऱ्यांमध्ये महिला आणि तरुणांचं प्रमाण जास्त आहे. टू-व्हीलर कर्ज (Two Wheeler Loans) हा नवा सेगमेंट त्यामुळे देशात तयार झाला आहे.
कर्जाचं प्रमाण कोव्हिड नंतरच्या काळात आणखी वाढताना दिसतंय. 2021 च्या तुलनेत टू-व्हीलर कर्ज घेणाऱ्यांची संख्या 13.5%नी जास्त आहे. रुपये 75,000 पेक्षा जास्त कर्ज काढणाऱ्यांची संख्या तर 28%नी वाढली आहे. दुचाकी वाहन कर्जाचा आढावा घेतला तर सध्या 9.35% दरापासून ही कर्ज सुरू होतात आणि साधारणपणे 10,000 रुपयांच्या कर्जासाठी 251 रुपये या प्रमाणात तो हप्ता जातो.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये देशात 134 लाख 70 हजार रुपयांच्या दुचाकी वाहनांची विक्री झाली. आणि देशात सध्या 80,000 कोटी रुपयांची दुचाकी वाहन कर्जं चालू खात्यात आहेत. दुचाकीसाठी कर्जं घेणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्यं आघाडीवर आहेत. यातून ग्रामीण भागातल्या लोकांचा वाढता कल लक्षात येतो.
आणि कर्जं घेणाऱ्यांचे वयोगटही महत्त्वाचं निरीक्षण आहे. कर्ज घेणाऱ्यांमध्ये 24 ते 35 हा वयोगट कर्ज घेण्यात सगळ्यात सक्रिय आहे. त्या खालोखाल 36 ते 50 वर्षं वयोगटातल्या लोकांनी दुचाकी वाहन कर्जं घेतली आहेत. महिलांनी दुचाकीसाठी कर्जं घेण्याचं प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत 17.5 टक्क्यांनी वाढलं आहे.
खरंतर वाहन उद्योगासाठी कोव्हिड नंतरचा काळ हा मंदीचा आहे. लोकांनी लॉकडाऊन नंतर वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. पण, विक्रीचे आकडे बघता 2023-24 मध्ये दुचाकी वाहन विक्री आपल्या कोव्हिड पूर्व काळातल्या उच्चांकापर्यंत पोहोचेल असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो आहे.