पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतीयांमध्ये देखील गुंतवणुकीबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. महागड्या मोटारी खरेदी करण्यापेक्षा हीच रक्कम गुंतवणूक करुन भविष्याला सुरक्षित करण्याकडे भारतीयांचा कल आहे. त्यामुळेच शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला आहे. हा ट्रेंड मात्र लक्झुरी कार उत्पादकांसाठी नवे संकट म्हणून उभे राहिले आहे. लक्झरी कारची विक्री कमी होण्यास ग्राहकांचा गुंतवणुकीकडे वाढता कल कारणीभूत ठरला आहे.
म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपीमधून होणारी गुंतवणूक (नियोजनबद्ध गुंतवणूक) मर्सिडिजची विक्री कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे मर्सिडिज बेंझ इंडियाचे (Mercedes-Benz) विक्री विभागाचे प्रमुख संतोष अय्यर यांनी म्हटलं आहे.
शेअर मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता असून देखील एसआयपीमधून होणारी गुंतवणूक थक्क करणारी असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे. भारतातील श्रीमंत आणि सुपर रिच वर्गाची संख्या वाढत आहे. कोराना संकटानंतर देशातील लक्झुरी कारच्या व्यवसायात वेगाने वृद्धी झाल्याचे दिसून आले होते, मात्र आता तो वेग मंदावला आहे. दर महिन्याला मर्सिडिजचा सरासरी 15000 ग्राहक चौकशी नव्या कारसाठी चौकशी करतात. मात्र प्रत्यक्षात जेमतम 1500 कारची विक्री होते. उर्वरित 13500 ग्राहक कुठे जातात, असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला.
मर्सिडिज घेण्याची क्षमता असणारे ग्राहक शोरुममध्ये चौकशी करतात, मात्र ऐनवेळी खरेदीचा बेत रद्द करतात. यामागे शेअर मार्केटमधील एसआयसी गुंतवणूक कायम ठेवणे किंवा मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची वाट पाहणे अशी मानसिकता दिसून येते, असे अय्यर यांनी सांगितले. अमेरिका आणि इतर विकसित देशांतील नागरिकांप्रमाणे भारतीय देखील भविष्याबाबत जागरुक झाले आहेत. बचतीची मानसिकता भारतीयांमध्ये वाढत आहे. केवळ स्वत: पुरते बचत न करता मुलांच्या भविष्यासाठी देखील गुंतवणूक करण्याचा ट्रेंड सध्या झपाट्याने वाढत असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
‘SIP’मधून होतेय दरमहा 13000 कोटींची गुंतवणूक
म्युच्युअल फंडांची संस्था अॅम्फिच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2022 मध्ये एसआयपीमधून (SIP) शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला होणारी गुंतवणूक 13000 कोटींपार गेली होती. आजवरचा एसआयपी गुंतवणुकीचा रेकॉर्ड आहे. यापू्र्वी काही महिने 12000 कोटींची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून होत होती.