उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण कुठल्या देशात आहे हे जाणून घेण्यासाठी केलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारताने चौथा क्रमांक पटकावला आहे.. ग्लोबल मॉनिटर या संस्थेनं तसा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी 2019 मध्ये भारत 6 व्या स्थानावर होता. 2020 साली चौथ्या तर 2021 साली भारताला थेट 16 स्थानं मिळालं होतं. मात्र, 2022 च्या क्रमावारीत पुन्हा एकदा भारताने चौथं स्थान मिळवलं आहे.
उद्योगस्नेही वातावरण म्हणजे काय
उद्योगस्नेही वातावरण म्हणजे नवीन उद्योग सुरू करायचा झाल्यास उपलब्ध असलेल्या सुविधा सरकारी धोरणं यांचा एकत्रित आढावा. एखाद्या ठिकाणी नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा, उद्योगाला आवश्यक त्या परवानग्या मिळण्याची प्रक्रिया, त्यातील सुलभता, स्थानिक सरकारचे पाठबळ, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती अशा विविध गोष्टींचा समावेश असतो.
ज्या भागात, राज्यात वा देशात या सर्व गोष्टी उद्योजकाला सहज, सुलभरीत्या मिळतात त्याठिकाणी अधिकाधिक उद्योजक गुंतवणूक करुन आपले उद्योगधंदे सुरू करत असतात. अर्थातच या गोष्टीमुळे तेथिल रोजगाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळत असते. त्यामुळे उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, त्याला अनुकूल असे धोरण तयार करुन प्रभावीरीत्या अंमलबजावणी करणे हे प्रत्येक राज्याचे प्राथमिक उद्दिष्ट बनत आहे.
केंद्रसरकारची उद्योगस्नेही धोरणं
केंद्र सरकारची उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेली एक खिडकी योजना ही खूप फायदेशीर ठरत आहे. या योजने अंतर्गत नवीन उद्योजकांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या या एकाच ठिकाणी मिळवता येतात. तसेच परदेशी गुंतवणूकदारांना सुद्धा गुंतवणूकी संदर्भात जी माहिती गरजेची असते ती सर्व माहिती या एकाच योजनेच्या माध्यमातून पुरवली जाते. या योजनेच्या माध्यमातून एक उद्योगाची परवानगी एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे देण्याची जी वेळखाऊ प्रक्रिया होती ती बदलल्याने उद्योजकांना खूप सोईचे झाले आहे.
एक खिडकी योजने प्रमाणेच केंद्र सरकारचे आत्मनिर्भर भारत अभियान, स्टार्ट-अप मिशन, मेक इन इंडिया मिशन, भारतीय नव-उद्योजकांना दिले जाणारे अनुदान, सवलती या सर्व गोंष्टीचा सकारात्मक परिणाम म्हणून भारत आज उद्योगस्नेही देश म्हणून ओळखला जात आहे.