देशाच्या चालू खात्यातली तूट (Current Account Deficit) आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 36.4 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. ही तूट जीडीपीच्या (GDP) 4.4% इतकी आहे. अर्थव्यवस्थेचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा डेटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षांत एप्रिल - जून तिमाहीत ही तूट 18.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजेच तूट दुपटीने वाढली आहे. यापूर्वी 2012-13 मध्ये चालू खात्यातली तूट 31.77 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. त्यानंतर प्रथमच ही तूट इतक्या वर पोहोचली आहे.
अलीकडच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला बसलेल्या फटक्यामुळे ही तूट वाढणार अशीच तज्ज्ञांची अपेक्षा होती.
‘जून ते सप्टेंबर तिमाहीत चालू खात्यातली तूट वाढेल असाच अंदाज होता. आयात - निर्यातीतली तफावत तसंच सांगत होती. पण, ही तूट 31-34 अब्ज अमेरिकन डॉलरची असेल असा आमचा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात हा आकडाही तुटीने पार केला.’ असं ICRA संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी बोलून दाखवलं.
चालू खात्यातली तूट म्हणजे काय? What is the Current Account Deficit?
देशातून वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी बाहेर गेलेला पैसा आणि वस्तू, सेवांच्या विक्रीतून देशाला मिळालेला पैसा यांच्यातली तफावत म्हणजे चालू खात्यातली तूट. जर आवक जास्त असेल तर चालू खात्याचा अधिशेष म्हणजे सरप्लस धरण्यात येतो. व्यापाराबरोबरच भांडवलाचं आंतरराष्ट्रीय हस्तांतरणही चालू खात्यात धरलं जातं. म्हणजे उद्योगधंद्यासाठी परदेशात झालेली गुंतवणूक किंवा परदेशातून भारतात झालेली गुंतवणूक.
चालू खात्यातली तूट का वाढली? Why is CAD?
कोव्हिड नंतर जगात आलेली मंदी आणि रशिया - युक्रेन दरम्यानचं युद्ध यामुळे जगभरातच महागाई वाढलीय. अन्नधान्याच्या किमती खास करून वाढल्यात. अशावेळी देशाची आयात जास्त असेल तर त्यासाठी देशातून जास्त पैसा बाहेर जातोय. आणि त्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागतायत. म्हणूनच चालू खात्यातही ही तूट सध्या वाढलीय. ती जीडीपीच्या 2-3% पर्यंत आटोक्यात ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न असतो. जुलै - सप्टेंबर तिमाहीत भारताची आयात 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेली.
वस्तूंच्या आयात - निर्यातीत भारत मागे असला तरी सेवांच्या बाबतीत भारताचा अधिशेष म्हणजे सरप्लस आहे. सेवांच्या निर्यात आयातीपेक्षा 34.4 अब्ज अमेरिकन डॉलरनी जास्त होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत सेवांच्या निर्यातीत 30.2% वाढ झाली आहे.