भारत आणि कॅनडा यांच्यात वाद शिगेला पोहोचला आहे. अशात भारताने कॅनडासंदर्भात कडक धोरणं अवलंबायला सुरूवात केली आहे. मात्र भारताशी पंगा घेणं कॅनडाच्या इकोनॉमीसाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असणार आहे. एका रिपोर्टनुसार कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान वार्षिक 3 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे भारताशी शत्रुत्व अवलंबल्यास कॅनडाला इतक्या मोठ्या नुकसानाला सामोरं जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक तज्ज्ञांनी कॅनडाबाबत व्यक्त केली भीती
यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका लागू शकतो अशी भीती जगातले अर्थतज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. इथं शिकणारे भारतीय विद्यार्थी 2 लाखांच्या घरात आहेत.या विद्यार्थ्यांच्या फीमुळे कॅनडा सरकारला 75 हजार कोटी रुपये मिळतात. इथं काम करणाऱ्या 20 लाख भारतीयांच्या योगदानातून अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा दबदबा आहे.
कॅनडात भारतीयांचं सर्वात जास्त योगदान
कॅनडाला राहाणारे भारतीय तिथल्या प्रॉपर्टी, आयटी,रिसर्च ट्रॅव्हल आणि स्मॉल बिझनेस सेक्टरमध्ये सर्वात महत्वाचं योगदान देतात. कॅनडात इस्टेटीच्या गुंतवणूकीत भारतीयांचं योगदान सर्वोच्च आहे. त्यानंतर तिथं चीन तिथं याक्षेत्रात गुतवणूक करतं.
सीआयआयच्या रिपोर्टनुसार भारतीय कंपन्यांनी कॅनडात, साल 2023 पर्यंत जवळपास 41 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे तर 17 हजारपेक्षा जास्त नोकऱ्या भारतीयांच्या या उद्योगक्षेत्रातून निर्माण झाल्या आहेत.
2022 साली एक लाख भारतीयांनी कॅनडा ते भारत असा प्रवास केला आहे. तर 70 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे तिथे भारतीयांनी स्मॉल बिझनेसमध्ये गुंतवल्याचंही पाहायला मिळालं आहे.