• 02 Oct, 2022 09:53

बडोदा बॅंकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ!

बडोदा बॅंकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ!

बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda)ने 2 कोटी रूपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील महत्त्वाच्या बँकांनी कर्जावरील व्याज दरात लगेच वाढ केली. त्यानंतर आता या बॅंकांनी मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यास सुरूवात केली. देशातील काही महत्त्वाच्या बॅंकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅंक ऑफ बडोदाने गुरूवारपासून (दि. 28 जुलै) 2 कोटी रूपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. बॅंकेने त्याबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन दर जाहीर केले आहेत.

बडोदा बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात केलेल्या वाढीमुळे सर्वसाधारण नागरिकांना दिल्या जाणारा व्याजदर 3 ते 5.50 टक्के या दरम्यान तर ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार व्याज दर 3.50 ते 6.50 टक्के  असेल.

बडोदा बॅंकेचे मुदत ठेवींवरील नवीन व्याजदर!

bank of baroda new interest rate for FD

बडोदा बॅंकेने 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 2.80 टक्क्यांवरून 3.00 टक्के, तर 46 दिवस ते 180 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 3.70 टक्क्यांवरून 4.00 टक्के इतकी वाढ केली. तसेच 181 दिवस ते 270 दिवसांकरीत मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना बॅंकेकडून 4.65 टक्के हा व्याज दर दिला जाणार आहे. जो पूर्वी 4.30 टक्के होता. बॅंकेने या दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्याचप्रमाणे 271 दिवस व त्यापेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या मुदत ठेवींच्या व्याज दरात 25 बेसिस पॉईंटने वाढ केली. त्यामुळे 1 वर्षांच्या आतील आणि 271 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आता 4.65 टक्के व्याज दर दिला जाणार आहे.

तसेच बडोदा बॅंकेने नवीन व्याज दर जाहीर केल्याप्रमाणे, 1 वर्षात मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवर आता 5.30 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. पूर्वी 1 वर्षांच्या मुदत ठेवींसाठी बॅंक 5 टक्के व्याजदर देत होती. यामध्ये 30 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. याचबरोबर 1 ते 2 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवर 5.45 टक्के, 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींसाठी 5.50 टक्के, तर 3 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5.50 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी या कालावधीसाठी 5.35 टक्के इतका व्याजदर बॅंकांकडून दिला जात होता.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) काही दिवसांपूर्वी 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदरात (SBI Interest Rates 2022) वाढ केली. 

एसबीआयचे नवीन एफडी दर (New FD rate of SBI)

7 दिवस ते 45 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर बँक 3.50 टक्के तर 46 दिवस ते 179 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवर स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) 4.00 टक्के व्याजदर देणार आहे. 180 दिवस ते 210 दिवसांपर्यंत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर 4.25 तर 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर एसबीआयने आपला व्याजदर 4.50 टक्के कायम ठेवला आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर आता 5.25 टक्के व्याज मिळणार आहे; जे पूर्वी 4.75 टक्के होते. त्यात 50 बीपीएसची वाढ करण्यात आली.