Income Tax Returns : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सगळ्यांचीच आयकर भरण्याची तयारी सुरू झाली असेल. पण कर भरताना कळत-नकळत काही चुका करत असतो. असं म्हणतात डॉक्टर आणि वकिलांपासून काहीच लपवायचं नसतं. तसंच इन्कम टॅक्स भरताना सुद्धा आपल्या सीए पासून आपण काहीच लपवायचं नसतं. त्यामुळे दरवर्षी वेळेवर करपत्र भरणं आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती देत योग्य तो फॉर्म निवडणं सुद्धा गरजेचं आहे. तर पाहुयात कर भरताना आपण कोणकोणत्या चूका टाळायला पाहिजेत.
Table of contents [Show]
दरवर्षी आणि वेळेवर आयकर विवरणपत्र न भरणं
जबाबदार नागरिक म्हणून दरवर्षी इन्कम टॅक्स भरणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे, वेळेत हा आयकर भरला पाहिजे. जर वेळेवर कर भरला नाही तर 10 हजार पर्यंतचा दंड भरावा लागतो. जो कर भरला नाही त्यावर 1 टक्क्यांनुसार व्याज आकारले जाते. तसेच आपल्याला मिळणारे रिफंड सुद्धा उशीरा मिळतो. मात्र, जर आपण दरवर्षी नियमांनुसार कर भरलाच नाही तर आयकर विभाग आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतो. यामध्ये आपण जेव्हापासून कर भरलेला नाहीये तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या करावर व्याज आकारले जाते. तसेच 3 ते 7 वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.
चुकीचा फॉर्म, चुकीची वैयक्तिक माहिती, असेसमेंट वर्षं निवडणं
आयकर भरताना आपल्या मिळकतीच्या स्त्रोताप्रमाणे आपल्याला योग्य तो फॉर्म निवडायचा असतो. जर आपण चुकीचा फॉर्म निवडला तर आयकर विभागाकडून तो नाकारला (Reject) जातो. जर आपण फक्त नोकरी करत असू तर आपल्याला आयटीआर 1 फॉर्म घ्यायचा असतो. जर आपण नोकरी करत असू व नोकरीसोबतच आपण केलेल्या काही गुंतवणूकीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर आपल्याला आयटीआर 2 फॉर्म घेतला पाहिजे. याशिवाय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंना आयटीआर फॉर्म 3 भरावा लागतो.
हे फॉर्म भरताना आपल्या नावाचे स्पेलिंग, अन्य डिटेल्स, पॅन कार्ड नंबर, बँक खात्याचे डिटेल्स अचूक देणे गरजेचे असते. कारण ही अत्यावश्यक माहिती जर आपण चुकीची दिली तर आयकर विभागाकडून आपला फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो.
बऱ्याचदा विवरणपत्र भरताना आपण असेसंमेंट इयर आणि फायनान्शियल इयर मध्ये गल्लत करत असतो. फायनान्शियल इयर मध्ये आपल्याला नुकताच संपलेले आर्थिक वर्ष नमुद करायचं असतं. तर असेसमेंट इयर मध्ये आपल्याला नवीन सुरू झालेलं आर्थिक वर्ष निवडायचं असतं. उदा. आता जेव्हा आपण विवरणपत्र भरु तेव्हा फायनान्शियल इयर एप्रिल 2022 - मार्च 2023 असेल. तर असेसमेंट इयर हे आताचे चालु आर्थिक वर्षे म्हणजे एप्रिल 2023 - मार्च 2024 असेल.
सर्व बँक खाती व उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती न देणं
आयकर भरताना सगळ्या बँक खात्यांची माहिती देणे अनिर्वाय असते. नोकरी करत असू तर सॅलरी खातं, पर्सनल किंवा जॉइन खातं, परदेशातल्या बँकेत जरी आपले खाते असेल तर त्याची सुद्धा माहिती द्यावी लागते. उत्पन्नांच्या स्त्रोतांची माहिती देताना अधिक काळजी घ्यावी लागते. जरी नोकरी करणारा व्यक्ति असला तरी जर त्या व्यक्तिला इतर मार्गातून उत्पन्न मिळत असेल जसं की, कोणत्याही स्वरूपातले भाडे, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतुन मिळणारे व्याज, जर जुन्या आर्थिक वर्षामध्ये नोकरी बदलली असेल तर दोन्ही कंपन्यामधील पगाराची माहिती अशी माहिती सविस्तर स्वरूपात द्यायची असते.
अनेकदा शेअर बाजार व म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील फायदा तोटा हा आयकर विवरण पत्रामध्ये दाखवला जात नाही. मात्र, जर आयकर विभागाच्या हे निदर्शनास आले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून जर तुम्ही भांडवली बाजारमध्ये गुंतवणूक करत असाल तर इन्कम टॅक्स भरतेवेळी कॅपिटल टॅक्स गेन्स हे सर्टिफिकेट घेऊन त्यातील माहिती नोंदवणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, बँकेतील सेव्हिंग्ज खात्यावर मिळणारे व्याज सुद्धा दाखवावं लागतं. बऱ्याचदा व्याजावर करसूट असल्याने ते दाखवले जात नाही. मात्र, 10 हजारावरील व्याजावर कर आकारला जातो.
लहान मुलांचं उत्पन्न न दाखवणं
होय. नवीन कर प्रणालीनुसार लहान मुलांचे उत्पन्न हे त्यांच्या पालकांचे उत्पन्न म्हणून ग्राह्य धरलं जातं. मात्र, जर तुमच्या मुलांना एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं असेल तर त्याची वेगळी इन्कम टॅक्स फाईल तयार करावी लागते.
आयकर विवरणपत्र तपासून न घेणं व पुन्हा दुरूस्तीसह पुन्हा सादर न करणं
आयकर विवरण पत्र भरताना काही चुका होण्याची शक्यता असते. तेव्हा एकदा आपला फॉर्म भरून झाल्यावर आयकर विभागाकडून आपल्याला सर्व माहिती तपासण्यासाठी काही कालावधी दिला जातो. या कालावधीत आपली माहिती पुन्हा तपासून त्यामध्ये काही चूक असल्यास ती दुरूस्त करता येते. मात्र, एकदा का विवरण पत्र भरले की जबाबदारी संपली असा विचार करून दुर्लक्ष केलं जातं. हे चुकीचं आहे. आयकर विभागाकडून आपल्याला या विवरण पत्रातील चुका दुरूस्त करण्यासाठी अमर्याद संधी दिलेल्या आहेत. तेव्हा त्याचा फायदा घेऊन आपण विवरण पत्रात दिलेली माहिती ही अचुक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.