प्रश्न - मला बँक लॉकरमध्ये दागिने व काही महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. मात्र, यात महत्त्वाच्या वस्तू ठेवणे खरचं सुरक्षित आहे का?
महामनीचे उत्तर – महत्त्वाची कागदपत्रे, सोने-चांदीचे दागिने, पैसे अशा गोष्टी घरात ठेवणे सुरक्षित नसते. घरातून मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अनेकजण अशा वस्तूंना बँक लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. ठराविक शुल्क भरून बँक लॉकर भाड्याने घेता येते व यात तुम्ही कोणतीही वस्तू ठेवू शकता. परंतु, यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ठेवण्याआधी सुरक्षेची खात्री करणे गरजेचे आहे. यासाठी आरबीआयने मार्गदर्शक सुचना देखील जारी केलेल्या आहेत.
बँक लॉकरमध्ये महत्त्वाच्या वस्तू ठेवणे खरचं सुरक्षित आहे का?
बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू या पूर्णपणे सुरक्षित असतात व या वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी देखील बँकेची असते. आरबीआयच्या नियमांनुसार, लॉकरमधील कोणत्याही वस्तूची चोरी झाल्यास बँकेला संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी लागते. अशा स्थितीमध्ये बँकेला लॉकरसाठी वर्षाला घेतलेल्या भाड्याच्या 100 पट अधिक रक्कम भरपाई स्वरुपात ग्राहकाला द्यावी लागते.
याशिवाय चोरी, आग व इतर घटनांमुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान होणार नाही याचीही खबरदारी बँकेला घ्यावी लागते. परंतु पूर, भुकंप सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास याची जबाबदारी बँकेची नसते.
लक्षात घ्या की सोने-चांदी, महत्त्वाची कागदपत्रे यासाठी तुम्ही बँक लॉकरचा वापर करू शकता. मात्र, रोख रक्कम ठेवण्यासाठी याचा वापर करणे योग्य ठरत नाही. या नोटांचे नुकसान झाले तरीही भरपाई मिळणार नाही. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या रोख रक्कमेवर तुम्हाला व्याजही मिळत नसते. तुम्ही बँक लॉकरमध्ये रोख रक्कम ठेवू शकता. परंतु, पैशांची अनियमितता व ही रक्कम कुठून आली याची कागदपत्रे सादर न करू शकल्यास आयकर विभागाकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला रोख रक्कम ठेवायची असल्यास ती बँक खात्यात अधिक सुरक्षित राहते. या रक्कमेवर तुम्हाला व्याजही मिळते.
बँकेला लॉकरचा कधी व किती वेळा वापर झाला याबाबतची माहिती देखील एसएमएस व ईमेलच्या माध्यमातून ग्राहकांना द्यावी लागते.
मृत्यूनंतर बँक लॉकरमधील वस्तूंचे काय होते?
ज्याप्रमाणे आपण बँक खाते उघडताना किंवा पैसे फिक्स्ड डिपॉजिट म्हणून ठेवताना नॉमिनीचा उल्लेख करतो, त्याचप्रमाणे बँक लॉकरसाठी देखील नॉमिनीची नियुक्ती करता येते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँक लॉकर वापरण्याचा व त्यातील वस्तूंचा अधिकार हा नॉमिनीला दिला जातो. नॉमिनी हवे असल्यास लॉकर वापरू शकतो अथवा बंद करू शकतो.
याशिवाय, जॉइंट लॉकर असल्यास एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला बँक लॉकरचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. यासाठी बँकेकडे सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. जर बँक लॉकरसाठी कोणीही नॉमिनी नसेल तर अशा स्थितीमध्ये कायदेशीर प्रक्रियेद्वारे व्यक्तीच्या वारसाला सर्व हक्क दिले जातात.