Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Iran-Israel War Effect: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात महागाईचा भडका! 'या' 10 गोष्टींवर होत आहे थेट परिणाम

Iran-Israel War Effect

Iran-Israel War Effect: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे भारतातील सर्वसामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसपासून ते खाद्यान्नापर्यंत अनेक वस्तू महाग होत असून 10 प्रमुख क्षेत्रांना याचा फटका बसत आहे.

मध्यपूर्वेतील युद्ध जरी भारतापासून हजारो किलोमीटर दूर असले, तरी त्याचे पडसाद आता भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. भारत आपल्या इंधन आणि खतांच्या गरजांसाठी आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत असून भारतात महागाई वाढत आहे.

या युद्धामुळे भारतातील सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होत आहे, ते समजून घेऊया.

भारतावर होत असलेले 10 मोठे परिणाम:

  1. इंधन दरवाढ: कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 ते 110 डॉलरच्या पार गेल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होत आहे.
  2. महागडा गॅस: आखाती देशांतील गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा (LPG) तुटवडा निर्माण होत असून किमती वाढत आहेत.
  3. विमान प्रवास महागला: विमान इंधनाचे दर वाढल्याने विमान कंपन्या तिकीट दरात आणि फ्युएल सरचार्जमध्ये वाढ करत आहेत.
  4. खतांचे संकट: भारत युरिया आणि फॉस्फेटसाठी आखाती देशांवर अवलंबून आहे. युद्धामुळे खतांच्या आयातीत 25 टक्क्यांपर्यंत घट होत आहे.
  5. अन्नधान्य टंचाई: खते आणि इंधन महागल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे, परिणामी बाजारात भाजीपाला आणि धान्य महाग होत आहे.
  6. वाहतूक आणि विमा शुल्क: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे सागरी मालवाहतुकीचा खर्च आणि विम्याचे हप्ते वाढत असून आयात वस्तूंच्या किमतींवर परिणाम दिसून ये आहे.
  7. रुपयाची घसरण: महागड्या तेल आयातीमुळे भारताची व्यापार तूट वाढत असून डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होत आहेत.
  8. शेअर बाजारात पडझड: युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असून, शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंड आणि पेन्शन बचतीवर परिणाम पाहायला मिळतोय.
  9. उत्पादन खर्च वाढला: स्टील, ॲल्युमिनियम आणि रसायने तयार करणाऱ्या उद्योगांना वाढीव ऊर्जा खर्च सोसावा लागत असल्याने तयार वस्तूंच्या किमती वाढत आहेत.
  10. परकीय चलनाचा ओघ घटतोय: आखाती देशात राहणारे सुमारे 91 लाख भारतीय दरवर्षी 50 अब्ज डॉलर्स भारतात पाठवतात. युद्धामुळे त्यांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर परिणाम होत आहे.

सरकारचे प्रयत्न

तेलाचा तुटवडा टाळण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडरचे उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले असून देशाकडे पुरेसा आपत्कालीन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.