दरवर्षी 31 मे ला जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. जगभरात धूम्रपान व तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच्या सेवनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. लोकांना तंबाखूच्या सेवनापासून होणाऱ्या आजारांबाबत माहिती देणे व त्याबाबत जागृकता पसरविण्यासाठी हा दिवस पाळला होता. 1987 मध्ये सर्वात प्रथम तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिवसाची घोषणा करण्यात आली होती. 1988 पासून दरवर्षी 31 मे ला हा दिवस पाळला जात आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त तर आहेच. मात्र, यातील आर्थिक गणित देखील मोठे आहे. जगभरातील तंबाखूची शेती, या पिकातून उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या व आजारपणावर होणार खर्च, अशी मोठी आर्थिक आकडेवारी यात गुंतलेली आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू
दरवर्षी धुम्रपान व तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचा आकडा धक्कादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WTO), या महामारीमुळे जगभरात दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू होता. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 13 लाख लोक हे धुम्रपान करत नाहीत. धुम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात आल्याने या लोकांचा मृत्यू होतो.
भारत हा जगात तंबाखू सेवन उत्पादनाच्याबाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचे सेवन दरवर्षी भारतातील 13 लाख 50 हजार लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. भारतात प्रामुख्याने खैनी, तंबाखूसह सुपारी, बिडी, सिगारेट, हुक्का अशा विविध तंबाखूचे सर्वाधिक सेवन केले जाते. या तंबाखूजन्य पदार्थांचे भारतातील मार्केट प्रचंड मोठे आहे.
आजारपणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च
तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग होणाऱ्यांचा आकडा गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढला आहे. भारतात कर्करोग होणाऱ्यांपैकी दर तिसऱ्या व्यक्तीला तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होतो. याशिवाय, फुफ्फुस, ह्रदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचा देखील सामना करावा लागतो.
या आजारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम पाहायला मिळतो. तंबाखूच्या उत्पादनातून कर मिळत असला तरीही वैद्यकीय सेवांवर होणारा खर्चही जास्त आहे. WTO च्या रिपोर्टनुसार, भारतात तंबाखू उत्पादनांच्या करामधून प्राप्त होणाऱ्या 100 रुपयांमागे अर्थव्यवस्थेला 816 रुपयांचा तोटा होत आहे. 2017-18 मध्ये भारतातील 35 वर्षांवरील व्यक्तींचा तंबाखूशी संबंधित आजारावर उपचाराचा खर्च जवळपास 177341 कोटी रुपये एवढा होता. म्हणजेच, भारताच्या एकूण जीडीपीच्या 1 टक्के खर्च या आजारांच्या उपचारावर खर्च होत आहे.
तंबाखू उत्पादन कंपन्यांची कमाई
प्रसिद्ध सिनेकलाकारांच्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. याशिवाय, ‘हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत’, असे वाक्य देखील या पदार्थांवर तुम्ही वाचली असतील. भारतातील अनेक राज्यात अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी देखील आहे. असे असले तरीही या धोकादायक पदार्थांची सर्रास विक्री होण्यामागे आर्थिक गणिते आहेत.
शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पीक घ्यावे, यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे 2017 ते 2022 या कालावधीत 111889 एकर जमिनीवर तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली. तंबाखू उत्पादनाच्याबाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022-23 या कालावधीत भारताने 9740 कोटी रुपयांच्या तंबाखूची निर्यात केली. आयटीसी लिमिटेड, फिलिप मॉरिस इंटरनॅशनल (PMI), व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (GPI) या देशातील प्रमुख तंबाखू उत्पादन कंपन्या आहेत.
Thought Arbitrage Research Institute (TARI) च्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये भारतातील एकूण अर्थव्यवस्थेमध्ये तंबाखू क्षेत्राचे योगदान 11,79,498 कोटी रुपयांचे होते. तर 4.57 कोटी लोक या क्षेत्रात काम करतात. मात्र, या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेमधील योगदान मोठे असले तरीही या पदार्थांच्या सेवनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यांच्या समस्येवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत आहेत.