IMF अर्थात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी देशाचा जीडीपी विकासदर 5.9% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी त्यांचा अंदाज 6.1% इतका होता. म्हणजेच त्यांनी आधीचा आपला अंदाज बदलून देशाचा विकासदर 20 बेसिस पॉइंट्सने कमी होईल असा नवा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक मंदीसदृश वातावरण आणि माहिती - तंत्रज्ञान क्षेत्राला बसलेला फटका ही या मागची मुख्य कारणं असल्याचं बोललं जातंय. त्याचवेळी IMF ने भारत ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असंही नमूद केलं आहे.
आताचा विकास दर 7 टक्के
महत्वाचे म्हणजे IMF चा वाढीचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेक्षा कमी आहे. RBI च्या मते, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विकास दर सात टक्के आहे आणि चालू आर्थिक वर्षात 6.4 टक्के असु शकतो. 6 एप्रिल रोजी RBI ने आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या पतधोरण आढाव्यात चालू आर्थिक वर्षातील वाढीचाअंदाज 10 आधार अंकांनी वाढविला आहे.
जागतिक बँकेच्या अंदाजानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढेल. त्याचवेळी आशियाई विकास बँकेने 6.4 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ IMF चा अंदाज सर्वात कमी वर्तविल्या गेला आहे.
काय आहे IMF चा अंदाज
सांख्यिकी मंत्रालयाच्या मते, IMF च्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 11 एप्रिल रोजी प्रसिध्द झालेल्या जागतिक आर्थिक आऊटलूक अहवालात, IMF ने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा वाढीचा अंदाज 50 आधार अंकांनी कमी करुन 603 टक्के केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते भारताचा किरकोळ महागाई दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4.9 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4.4 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
या IMF अहवालानुसार, जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2.8 टक्के आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3 टक्के वाढेल, यामध्ये देखील 10 बेसिस पॉईंटसची कपात करण्यात आली आहे.
IMF च्या शास्त्रज्ञाचं विधान
आयएमएफचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास म्हणाले की, पुरवठा साखळीतील अडचण आणि युध्दामुळे ऊर्जा आणि अन्न बाजारातील अडचण देखील कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या अंदाजानुसार जागतिक विकास दर यावर्षी 2.8 टक्के आणि 2024 मध्ये 3 टक्के असेल. तसेच. महागाई 2022 मधील 8.7 टक्क्यांवरुन यावर्षी 7 टक्के आणि 2024 मध्ये 4.9 टक्क्यांवर येऊ शकते.