तुमच्याकडे जर अतिरिक्त पैसे असतील आणि नजीकच्या काळात तुम्हाला त्याची गरज भासणार नसेल तर तुम्ही लिक्विड फंडात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. ओव्हरनाईट फंडाद्वारे अल्पकाळ म्हणजेच एका दिवस किंवा आठवडाभरासाठीही तुम्ही पैसे या फंडात गुंतवू शकता. जसे की, मुलांच्या शाळेची फी, पर्यटन किंवा एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले आहेत. ते पैसे बँकेच्या सेविंग अकाऊंटमध्ये पडून राहण्यापेक्षा लिक्विड किंवा ओव्हरनाईट फंडात गुंतवले तर जास्त परतावा मिळेल.
ओव्हरनाईट, लिक्विड फंड म्हणजे काय?
ओव्हरनाईट फंडाद्वारे अशा सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवले जातात ज्यांचा किमान कालावधी एक दिवस असतो. त्यामुळे सकाळी गुंतवलेले पैसे तुम्ही संध्याकाळी काढू शकता. त्यासोबत लिक्विड फंड मनी मार्केट आणि डेब्ट पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये पॉलिसी मॅच्युरिटी पिरियड 91 दिवसांचा म्हणजेच तीन महिन्यांपर्यंतचा आहे. ट्रेजरी बिल्स किंवा सरकारी रोख्यांमध्ये हे फंड गुंतवणूक करतात.
किती परतावा मिळू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एचडीएफसी बँकच्या बचत खात्यात जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हा 3 टक्क्यांच्या जवळपास व्याजदर मिळेल. मागील अनेक दिवसांपासून बचत खात्यावरील व्याजदरही तेवढेच आहेत. मात्र, ओव्हरनाईट आणि लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 6% टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतो.
गुंतवणूकीची किमान कालमर्यादा
1 ते 7 दिवसांपर्यंतच तुम्हाला गुंतवणूक ठेवायची असेल तर तुम्ही ओव्हरनाइट फंडामध्ये करायला हवी. तर 7 दिवस ते 3 महिन्यांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकत असाल तर तुम्ही इक्विटी फंडात गुंतवणूक करायला हवी. या मर्यादेच्या आधीच जर तुम्ही योजनेतून पैसे काढून घेत असाल तर तुम्हाला काही शुल्क लागू होते.
लिक्विड फंडमध्ये जोखीम किती?
म्युच्युअल फंडाच्या इतर प्रकारांपेक्षा लिक्विड फंडमधील गुंतवणूकीत जोखीम आणि अस्थिरता कमी असते. कारण, लिक्विड फंडातील पैसे सहसा, हाय क्रेडिट रेटिंग असलेल्या पर्यायांमध्येच गुंतवली जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त केलेली मते ही महामनी डॉट कॉमची ही वैयक्तिक मते नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लांगारांची मदत घ्या.)