Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अनेक बँक खाती असल्यास होऊ शकते नुकसान, वेळेत करा या गोष्टी

अनेक बँक खाती असल्यास होऊ शकते नुकसान, वेळेत करा या गोष्टी

अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.

आपण वेळोवेळी किंवा प्रसंगानुरूप वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती सुरू करतो. कधी कर्ज घेण्यासाठी, कधी नोकरीच्या निमित्ताने तर काही वेळेस आपल्या ओळखीची व्यक्ती बँकेत काम करते आणि त्याला ठराविक खाती उघडण्याविषयी बँकेकडून सांगण्यात आलेले असते. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी खाते उघडतो. पण काही वर्षानी इतक्या बॅंक खात्यांचा आपल्याला पश्चाताप होतो हे आपल्या लक्षात देखील येत नाही.

काही लोकांना ठराविक काळानंतर नोकरी बदलण्याची सवय असते. अशा लोकांची अनेक बँकांमध्ये खाती असतात, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण अनेक कंपन्या ठराविक बँकेत पगार खाते (Salary Account) ओपन करायला सांगतात. त्यामुळे आपल्याला खाते उघडण्याशिवाय पर्याय नसतो. पण नोकरी सोडल्यानंतरही कामाच्या गडबडीत अथवा इतर कामात व्यग्र असल्याने ते खाते बंद करणे राहून जाते आणि किती बँकांमध्ये आपली खाती आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. 

अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे  आपण समजून घेणार आहोत.

नुकसान की फायदा
अनेक बँकांमध्ये खाती असतील तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कधीही कमीतकमी खाती असलेले चांगले, असे आर्थिक तज्ज्ञ सांगतात. अनेक बँकात खाती असल्यास कशाप्रकारे आर्थिक नुकसान सहन करावे लागते याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्याही बँकेत एक ठराविक रक्कम ठेवणे बंधनकारक असते; त्याला मिनिमम बॅलेन्स (Minimum Balance) म्हणतात. आपली अनेक खाती असल्यास कोणत्या बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत हे लक्षात येत नाही. त्यामुळे मिनिमम बॅलेन्स राखणे कठीण जाते आणि प्रत्येक बँकेत मिनिमम बॅलेन्स ठेवायचा विचार देखील केला तर आपल्याकडे तितके पैसे असणे गरजेचे असते. तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्यावर दंड आकारला जातो. त्यामुळे काहीही कारण नसताना तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बँकेकडून सतत दंड आकारला जात असल्यास सिबिल स्कोअर खराब होतो. तुम्हाला कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशाप्रकारे दंड सतत आकारला गेल्यास तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणे देखील कठीण जाऊ शकते.

आर्थिक भुर्दंड
अनेक बँकांमध्ये खाती असल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसतो. सगळ्याच बँकांकडून अनेक चार्जेस लावले जातात. त्यामुळे अनेक खाती असल्यास तुम्हाला सगळ्याच खात्यांसाठी चार्जेस भरावे लागतात. मेन्टेनन्स चार्जेस, डेबिट कार्ड चार्जेस, एसएमएस चार्जेस, सर्व्हिस चार्जेस अशा अनेक चार्जेसचा विचार केला तर एक मोठी रक्कम आपण बँकाना देत असतो. त्यातही अनेक खाती असल्यास आपला अनावश्यक खर्च होतो हे आपल्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे हा पैसा वाचवल्यास तुमची चांगली बचत होऊ शकते.

टॅक्स रिटर्न
टॅक्स आणि गुंतवणूक तज्ज्ञ देखील अनेक बँकेत नव्हे तर एकाच बँकेत खाते ठेवण्याचा सल्ला देतात. केवळ एखाद्या बँकेत खाते असल्यास टॅक्स रिटर्न भरणे सोपे जाते. रिटर्न भरताना कोणकोणत्या बँकेत तुमची खाती आहेत, त्यात किती पैसे आहेत, वर्षभरात त्या खात्यांद्वारे कोणकोणते व्यवहार करण्यात आले, याची माहिती देणे गरजेचे असते. एकच बँक खाते असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीचे हिशेब काढणे सोपे होते. अनेक खाती असल्यास गोंधळ होण्याची शक्यता असते. तसेच एखाद्या बँक खात्यातील व्यवहार आपण दाखवण्यास विसरलो किंवा त्यात काही चुका झाल्यास नोटीस येऊ शकते. त्यामुळे केवळ एक किंवा दोन बँक खाती असल्यास आपला व्यवहार कशाप्रकारे सुरू आहे. याकडे लक्ष देणे सोपे जाते. तसेच प्राप्तिकर विवरणपत्र भरताना देखील अतिशय सोपी प्रक्रिया पार पाडली जाते.

इनअ‍ॅक्टिव्ह खाते
कोणत्याही बँकेच्या खात्यात वर्षभरात कोणताही व्यवहार केला नसल्यास ते खाते इनअ‍ॅक्टिव्ह होते. ते खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँकेकडून काही दंड आकारला जातो. तसेच तुमची आवश्क कागदपत्रे (KYC) पुन्हा एकदा बँकेला द्यावी लागतात. दोन वर्षांपर्यंत एखाद्या बँकेच्या खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास त्या खात्याचे डॉरमॅंट खात्यात (Dormant account) रुपांतर होते. अशा डॉरमॅंट खात्याच्या माध्यमातून गैरव्यवहार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खाते डॉरमॅंट होण्याच्या आधीच ते बंद केलेले चांगले असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांकडून नेहमीच दिला जातो.

वापरत नसलेले खाते
एखादे खाते तुम्ही दीर्घकाळापासून वापरत नसाल तर ते त्वरित बंद करावे. खाते बंद करण्यासाठी तुम्ही जास्त काळ घालवला तर तुम्हाला चांगलाच आर्थिक फटका बसू शकतो.

खाते बंद करण्याची प्रक्रिया 
बँकेतील खाते बंद करण्यासाठी बँकेत जाऊन अर्ज द्यावा लागतो. अर्जात खाते बंद करण्याची कारणे नमूद करावी लागतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू होते. 

बॅंकेची किती खाती असावीत?
तुमची बँकेत किती खाती असली पाहिजेत असा प्रश्न अनेकवेळा सर्वसामान्यांना पडतो. केवळ एखाद्या बँकेत तुमचे खाते असावे. त्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक व्यवहार करणे सोपे जाते. गरज असल्यास तुम्ही जास्तीत जास्त दोन खाती ठेवू शकता. पण त्यापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.