कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संबंधित बहुतांश माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. मात्र तरीही अनेक जणांचा ईपीएफ संदर्भात गोंधळ उडतो. लोकांच्या मनात ईपीएफबाबत बरेच प्रश्न आहेत. जसे की, ईपीएफ खात्यामधून पैसे कसे आणि कधी काढू शकतो? पैसे काढण्याचे फायदे आणि तोटे काय? ईपीएफ खाते कसे हस्तांतरित करायचे? बऱ्याच जणांना हे सुद्धा माहित नाही की, एखाद्या खातेदाराने 3 वर्षांत ईपीएफ खात्यात पैसे गुंतवले नाही तर ते ईपीएफ खाते आपोआप बंद होऊ शकते. असे झाल्यास खातेदाराचे पैसे अडकू शकतात. चला तर याबाबत अधिक माहिती घेऊ.
Table of contents [Show]
EPF खाते कधी बंद होते?
तुम्ही काम करत असलेली कंपनी सोडली किंवा कंपनी बंद झाली असेल आणि ईपीईफ खात्यात 36 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नसेल, तर 3 वर्षानंतर हे खाते आपोआप बंद होते. बंद झालेले खाते हे निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीत जोडले जाते. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला संबंधित विभागासोबत संघर्ष करावा लागू शकतो. अशावेळी तुम्हाला बँकेच्या मदतीने KYC पूर्ण करून त्यातून पैसे काढता येऊ शकतात.
निष्क्रिय खाते म्हणजे काय?
भविष्य निर्वाह निधी खाते ज्यामध्ये 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कुठलीही रक्कम जमा झाली नसेल तर ते खाते निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीमध्ये जमा होते. दरम्यान, निष्क्रिय खात्यातील जमा झालेल्या रकमेवर व्याज जमा होत राहते.
बंद खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
बंद झालेले ईपीएफ खाते पुन्हा सुरु करण्यासाठी खातेदाराला KYC करावी लागते. यासाठी पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ईएसआय ओळखपत्र, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय आधारकार्ड देखील अनिवार्य आहे. त्याचबरोबर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी यांच्याकडून खात्यातून पैसे काढण्यासाठी व खाते हस्तांतर करण्यासाठी लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
कोणाच्या मान्यतेने व्यवहार होईल?
नोकरी करत असताना तुमच्या ईपीएफ खात्यात जमा झालेली रक्कम 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ईपीएफ विभागातील आयुक्तांच्या मान्यतेनंतरच पैसे काढता किंवा हस्तांतरित करता येतात. जर खात्यातील रक्कम 50 हजारांपेक्षा कमी व 25 हजारांपेक्षा जास्त असेल तर विभागातील अधिकाऱ्यांच्या परवानगीने ती काढता येऊ शकते. तसेच ती रक्कम 25 हजारांपेक्षा कमी असेल तर साहाय्यक अधिकारी ती काढण्यासाठी परवानगी किंवा मान्यता देऊ शकतात.
Source: www.zeebiz.com