तब्बल एका तपानंतर म्हणजेच 12 वर्षांनंतर आयसीसी मेन्स वर्ल्ड कप 2023 (ICC Men's Cricket World Cup 2023 )चं यजमानपद भारताकडे आलं आहे. यापूर्वी 2011 साली भारताने या स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं आणि ते या स्पर्धेचे विजेतेही झाले होते. यंदा मात्र ज्या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत तिथल्या हॉटेलचे भाव वधारल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे. सामन्यांच्या ठिकाणच्या हॉटेलांचे भाव तब्बल 80 टक्क्यांनी वाढल्याचं एका सर्वक्षणात आढळून आलं आहे. याशिवाय परदेशी फॅन्सना विमान प्रवास करायचा असेल तर त्यांनी त्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारतातल्या कोणत्या शहरात खेळवले जाणार सामने?
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसी वर्ल्डकप 2023 साठी भारतातली काही ठिकाणं जाहीर केली आहेत. अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, धर्मशाला,लखनऊ, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी पाच सामने खेळवले जाणार आहेत तर, हैदराबाद इथं तीन सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. तिकीटांच्या प्रचंड मागणीला पाहाता बीसीसीआयने संपूर्ण मालिकेसाठी चार लाख तिकीटं उपलब्ध करून दिली आहेत.
उत्सवांचा काळ हॉटेल इंडस्ट्रीच्या पडणार पथ्यावर
आयसीसी क्रिकेट विश्वचषक भारतात अशा वेळेत आयोजित करण्यात येत आहे जेव्हा भारतात उत्सवी माहोल असतो. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच काळात भारतात नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असे दोन महत्वाचे सण असणार आहेत. भारत आणि इथे साजरे केले जाणारे उत्सव यांचं जगात कुतूहल आहे. अशात भारतातल्या या उत्सवी वातावरणाचा अनुभव घ्यायला जगभरातनं पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. अशात भारतात येणाऱ्या याच परदेशी पाहुण्यांसाठीही हॉटेल इंडस्ट्री सज्ज असते. यंदा वर्ल्ड कप आणि उत्सवी काळ यांचा संगम साधला गेल्याने हॉटेल इंडस्ट्री तेजीत असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या काळात ज्यांना हवाई सफर करायची असेल त्यांनाही जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. एकीकडे हॉटेल इंडस्ट्रीत 80 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे त्याचवेळेस दुसरीकडे हवाई वाहतुकीतही 13 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. ज्या दिवशी देशात सामन्यांचं आयोजन नसेल त्या दिवशीच्या हवाई वाहतुकीच्या भावांमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. या दिवसांमध्ये सामान्य दरांपेक्षाही कमी तिकीट दर पाहायला मिळत आहेत.
मोठ्या स्क्रीनच्या टिव्हीच्या मागणीत वाढ
आता स्पर्धा मोठी असणार तर त्याचा आनंद घेण्यासाठी भारतीय दर्शक किंवा हॉटेल मालक मोठ्या टिव्हीला पसंती देत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय वाईन आणि मदयाच्या मागणीतही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.