नुकताच यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. ज्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. सध्या देशातील मोठा वर्ग हा यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससीचा (MPSC) अभ्यास करत आहे. कोणत्याही देशाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी कुशल अधिकाऱ्यांची गरज असते. लोकसेवा आयोगाच्या या परीक्षा सर्वात कठीण परीक्षा समजल्या जातात. उमेदवार वर्षानुवर्षे या परीक्षांचा अभ्यास करून परीक्षा देतो.
यूपीएससीमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन राउंड झाल्यावर उमेदवाराच्या श्रेणीनुसार त्याला पद देण्यात येते. ही पदे आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयईएस (IES) आणि आयएफएस (IFS) यासारखी असतात. ज्याची स्वतःची अशी एक प्रतिष्ठा असते. आज आपण आयएएस आणि आयपीएस पदासाठी मिळणारा मासिक पगार किती? जाणून घेऊयात.
आयएएस आणि आयपीएसमध्ये फरक काय?
आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) संदर्भातील परीक्षा लोकसेवा आयोगा मार्फत जरी घेण्यात येत असल्या तरीही या दोन्ही पदांमध्ये फरक आहे. या दोन्ही सेवा देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. त्यामुळेच या पदांना सर्वात जास्त मान आहे. आयएएसचे (IAS) काम कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत चालते, तर आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचे काम गृह मंत्रालया अंतर्गत चालते. या दोघांच्याही जवाबदाऱ्या आणि अधिकार हे वेगवेगळे असतात. असे असले तरीही आयएएस अधिकाऱ्याला मिळालेले अधिकार हे आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा जास्त असतात.
काही वर्षे सेवा केल्यानंतर या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी हे पद देण्यात येते. ज्याच्या मदतीने ते जिल्ह्याचा कारभार पाहतात आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. महत्त्वाचं म्हणजे एका विभागात एकच आयएएस अधिकारी असतो मात्र त्याच विभागात गरजेनुसार एकापेक्षा जास्त आयपीएस अधिकारी काम करतात. आयपीएस अधिकाऱ्यांना सेवेत कार्यरत राहिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक (Senior Superintendent of Police) हे पद देण्यात येते. या पदाअंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची जवाबदारी त्यांना राखावी लागते. मात्र कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यापूर्वी गरजेचे असलेले वॉरंट काढण्यासाठी त्यांना आयएएस अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते.
मासिक पगार जाणून घ्या
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर आयपीएस (IPS) आणि आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना महिना अंदाजे 56,100 ते 2,25,000 रुपये इतका पगार देण्यात येतो. हा पगार अनुभवानुसार आणि श्रेणीतील पदानुसार वेगवेगळा असू शकतो.
प्रशिक्षण आणि सर्वोच्च पद जाणून घ्या
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आणि मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराला मसुरी मधील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत (Lal Bahadur Shastri National Academy of Administration in Mussoorie) 3 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात. 3 महिन्यानंतर या दोन्ही प्रशिक्षणात मोठा बदल होतो.
आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना प्रशिक्षणानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यात येते. ज्यामध्ये प्रशासन, पोलिसिंग यासंदर्भातील माहिती दिली जाते. तर आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी हैद्राबादमधील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy in Hyderabad) येथे घोडेस्वारी, परेड, शस्त्र हाताळणे यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात.
आयएएस अधिकाऱ्यांना केंद्रातील कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary) हे पद देखील मिळू शकते. तर आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालक (State Director General of Police) हे पद मिळू शकते. तर केंद्रामध्ये आयपीएस अधिकारी सीबीआय (CBI), आयबी (IB) आणि रॉ चे संचालक म्हणून काम पाहू शकतात.