भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात आणखी तब्बल 100 स्वदेशी बनावटीची तेजस मार्क ए-1 (Tejas MARK 1A)विमाने दाखल होणार आहेत. यासाठी 8 अब्ज डॉलर किमतीची ऑर्डर हिंदूस्थान एअरोनॉटिक्स (HAL) या कंपनीला देण्याचा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्वदेशी एअरोस्पेस क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मिगची जागा घेणार तेजस
भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील मिग-21 (MIG-21) ही विमाने बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक LCA Mark 1A ही विमाने दाखल केली जाणार आहेत. या संदर्भात भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांची हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससह संरक्षण क्षेत्राशी निगडीत इतर घटकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय हवाई दलाने HAL कडून 100 LCA Mark-1A लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.
तेजसची प्रगत आवृत्ती LCA MARK 1A
LCA MARK 1A (Light Combat Aircraft (LCA) म्हणजेच लढावू श्रेणीतील तेजस (Tejas) विमानाची प्रगत आवृत्ती असून ही विमाने एव्हिओनिक्स आणि रडार सिस्टीमने सुसज्ज असणार आहे. तसेच ही विमानाच्या निर्मितीवेळी 65 % स्वदेशी साहित्य वापरले जाणार आहे.
लढाऊ विमानांचा ताफा वाढणार
पुढील 15 वर्षामध्ये भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात 40 LCA, 180 LCA MARK 1A, आणि सुमारे 120 LCA MARK 2A अशी विमानांची संख्या अस्तित्वात असेल. दरम्यान,LCA Mark1A या श्रेणीतील विमान खरेदीची ऑर्डर यापूर्वी देखील देण्यात आलेली आहे. त्यातील पहिले विमान फेब्रुवारी 2024 च्या आसपास वायुदलात दाखल होईल.