संरक्षण दल अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता वायू दलाच्या ताफ्यात 156 प्रचंड(Prachand) या हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी वायू दलाकडून मेक इन इंडिया धोरणाच अवलंब करत हिंदुस्थान एअरोनॉटिक्स या कंपनीला ही ऑर्डर दिली जाणार आहे. यापूर्वीच 100 तेजस फायटर जेट खरेदीची घोषणा करण्यात आली आहे. आता या प्रचंड हेलिकॉप्टरचाही वायू दलाच्या ताफ्यात समावेश केला जाणार आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात
संरक्षण दलाकडून भारत पाकिस्तान आणि भारत चीनच्या सीमेवर तैनात करण्यासाठी या प्रचंड या वैशिष्ट्यपूर्ण हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे हेलिकॉप्टर अपाचेच्या तुलनेत कमी वजनाचे आणि आकाराने मोठे आहे. याची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने (HAL) केली आहे. या हेलिकॉप्टरची अत्यंत प्रतिकूल वातावरण आणि भूप्रदेश असलेल्या ठिकाणांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर वायू दलाने सीमेवर तैनात करण्यासाठी आणखी 156 प्रचंड या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला आहे.
1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च
भारतीय वायूदलाने प्रचंड या हेलिकॉप्टरचा वायू दलातील ताफा वाढवण्याच्या दृष्टीने 156 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता असल्याची माहिती संरक्षण दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवासापूर्वीच भारतीय हवाई दलाने 100 हलक्या वजनाची तेजस मार्क 1A ही लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तेजस आणि प्रचंड या दोन्ही ऑर्डरसाठी एकूण 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.
प्रचंडची वैशिष्ट्ये-
हे हेलिकॉप्टर वाळवंटी प्रदेश आणि उंचावरील प्रदेशात काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा गरजेनुसार तयार करण्यात आले आहे.प्रचंड हे जगातील एकमेव लढावू हेलिकॉप्टर आहे जे 5,000 मीटर (16,400 फूट) उंचीवर उतरू आणि टेक ऑफ करू शकते, जे सियाचीन ग्लेशियर आणि पूर्व लडाखच्या उच्च-उंचीच्या भागात काम करण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यासाठी देखील प्रचंड हेलिकॉप्टर सक्षम आहे. या नवीन 156 हेलिकॉप्टरमधील 66 हेलिकॉप्टर हे भारतीय हवाई दलास आणि उर्वरित 90 भारतीय लष्कर ताब्यात घेणार आहेत.