Train Ticket Transfer Rules: रेल्वेच्या नियमांनुसार आरक्षित तिकीट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येते. त्यासाठी रेल्वेने योग्य नियम केले आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार, कोणतेही आरक्षित तिकीट दुसऱ्या व्यक्तिला ट्रान्सफर करता येते. परंतु, यासाठी त्या तिकीटाचा बर्थ किंवा सीट कन्फर्म असली पाहीजे. प्रतिक्षा यादीतील (Waiting List) तिकीटांच्या हस्तांतरणासाठी कोणतीही व्यवस्था नाही. रेल्वेने काही परिस्थितींचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये तिकीट हस्तांतरण होऊ शकते.
Table of contents [Show]
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तिकिट ट्रान्सफर होते
तुम्ही तुमचे तिकीट कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर ट्रान्सफर करु शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नातेवाईकांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करता येत नाही. कुटुंबातील सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरणासाठी, ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी मुख्य आरक्षण पर्यवेक्षक (CRS) कडे अर्ज करावा लागेल.
अत्यंत गरजेच्या वेळेस
जर तुम्हाला अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी तात्काळ परिस्थितीत प्रवास करायचा आहे, तर तिकीट हस्तांतरित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत अत्यंत वैध असे कारण देऊन, तिकीट हस्तांतरित केली जाऊ शकते. यावेळी ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना (The Commission of Railway Safety)लेखी विनंती करावी लागेल. त्यासह अत्यंत वैध असलेले कारण तुम्हाला लेखी विनंती अर्जात द्यावे लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की, या व्यक्तीच्या जागी ही व्यक्ती प्रवास करणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी तरतूद
जर एखादी प्रवासी हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचा विद्यार्थी असेल, तर तो देखील अत्यंत गरजेच्या परिस्थितीत त्याचे तिकीट दुसऱ्याला हस्तांतरित (Transfer) करु शकतो. यासाठी त्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना, त्या विद्यार्थ्याचे तिकीट दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्याची विनंती करावी लागेल. ही प्रक्रिया देखील ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी करावे लागेल, तेव्हा ती ग्राह्य धरली जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या नावे तिकीट आरक्षित केले असेल, आणि त्या बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्याला प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा तिकीट हस्तांतरित केले जाऊ शकते. यासाठी ते कर्मचारी ज्या प्राधिकरणाचे किंवा ज्या विभागाचे आहेत, तिथल्या वरीष्ठ अधिकाऱ्याला रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाच्या नावाने पत्र लिहून लेखी विनंती करावी लागेल. ही प्रक्रिया ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी करावी लागेल.
एनसीसी कॅडेट असल्यास तरतूद
तसेच एनसीसी मधील एखाद्या कॅडेटचे तिकीट असल्यास इतर कोणत्याही कॅडेटच्या नावाने हस्तांतरीत केले जाऊ शकते. यासाठी एनसीसी अधिकाऱ्याला रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांकडे अर्ज करावा लागेल. हा अर्ज गाडी सुटण्याच्या 24 तास आधी करावा लागेल.