जर तुम्हांला नुकतीच नोकरी लागली असेल आणि तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचे जर नियोजन कसे करावे याचा जर विचार करत असाल तर ही बातमी कास तुमच्यासाठी आहे. आयुष्याच्या पहिल्या पगाराची उत्सुकता प्रत्येकालाच असते. आपण या पगाराला घेऊन काही अंदाज बांधलेले असतात, काही स्वप्ने सजवलेली असतात. पहिला पगार आल्यानंतर हे घ्यायचे, ते घ्यायचे, मित्रांना पार्टी द्यायची, आईवडिलांना काही गिफ्ट द्यायचे असे सगळे प्लान करून झाले असतील तर थांबा!
ही तुमची पहिली कमाई आहे, त्यामुळे पहिल्या कमाईपासून जर तुम्ही तुमच्या पगाराचे नियोजन केले तर तुम्हांला भविष्यात कुठलाही मनस्ताप सहन करावा लागणार नाही, कारण हा आर्थिक शिस्तीचा एक भाग आहे.
मजबूत आर्थिक पाया तयार करण्यासाठी तुमचा पहिला पगार हुशारीने वापरणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या पहिल्या पगाराचा उपयोग तुम्ही कसा करावा याबाबत काही टिप्स खालीलप्रमाणे:
Table of contents [Show]
बजेट महत्वाचं!
तुम्हांला जितका पगार मिळणार आहे त्याला धरून तुम्ही स्वतःचे काही नियोजन करा. पहिल्या पगारात घरच्यांना, मित्र-मंडळींना मिठाई जरूर खाऊ घाला. मात्र महागड्या हॉटेलात पार्टी देणे टाळा. पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग होतोय का ते बघा. घरातील काही खर्च स्वतःहून अंगावर घ्या, त्यामुळे एक परिवार म्हणून तुमचे कर्तव्य देखील तुम्ही निभावू शकाल. यात तुम्ही इंटरनेट बिल, लाईट बिल असा खर्च उचलू शकता.
आपत्कालीन निधी तयार करा
आता तुम्ही म्हणाल पहिल्याच पगारात कोण आपत्कालीन निधी तयार करतं? मात्र याला प्राधान्य द्या. एकदा का तुम्ही कमावते झाला की घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि मित्र-मंडळींच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. त्यामुळे कधी कुणाला मदत करावी लागेल किंवा स्वतःवर तशी वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून तुमच्या पहिल्या पगारापासूनच एका वेगळ्या बचत खात्यात किमान तीन ते सहा महिन्यांचा खर्च भागवता येईल यासाठी आवश्यक असलेले निधी जमा करण्याचे ध्येय ठेवा.
थकबाकी भरा
जर तुमचे किंवा तुमच्या घरच्यांचे कुणाला पैसे देणे बाकी असेल तर ते आधी फेडून टाका. आपल्यावरील कर्ज, उसणे घेतलेले पैसे परत फेडणे यात एक समाधान असते आणि तुमचा भार देखील हलका होतो. सगळ्यांची देणी मिटली की मग स्वतःसाठी आर्थिक नियोजन करणे सोपे जाते हे लक्षात घ्या.
गुंतवणूक कराच!
आर्थिक गुंतवणूक करणे हा एक चांगला गुण आहे हे लक्षात घ्या. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तितका जास्त तुम्हाला परतावा मिळेल हे लक्षात असू द्या. यासाठी तुम्ही तुमच्या पहिल्या पगारापासूनच विचार करायला हवा. स्वतःचा आणि कुटुंबियांचा आरोग्य विमा देखील उतरवून घ्या. तुमच्या पगाराचा काही भाग म्युच्युअल फंड, मुदत ठेवी किंवा स्टॉक यासारख्या विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवण्याचा विचार करा. आवश्यक असल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.
जीवनशैली साधीच बरी!
बचत करणे म्हणजे मौजमजा करायची नाही असे नाही. ज्याचे आर्थिक नियोजन उत्तम असते अशी व्यक्ती स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेत असतो आणि जगण्याची मजा देखील घेत असतो. त्यामुळे उगाच महागडे हॉटेल्स, महागडे कपडे यांची खरेदी न करता आवश्यकतेनुसार आपली जीवनशैली बनवा.
लक्षात ठेवा, तुमच्या पहिल्या पगाराचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आणि स्थिर आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन नियोजन हे महत्त्वाचे आहे. तुमचे आर्थिक नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी, तुम्हाला मदत हवी असल्यास आर्थिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.