वयाची साठी ओलांडण्याआधीच निवृत्त होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे हे प्रत्येकाच शक्य होते असे नाही. नोकरी किंवा इतर कोणत्याही कामाचा कंटाळा येत असेल तरी नाइलाजाने तेच काम करावे लागत असेल तर तुम्हाला वेगळा विचार करण्याची गरज आहे. साठ वर्षापर्यंत निवृत्त होण्याची वाट का पाहायची? तुम्ही त्याआधीच निवृत्ती घेऊ शकता. मात्र, त्याआधी योग्य नियोजन करून आर्थिक स्वावलंबी व्हावे लागेल. तुमच्याकडे जमा झालेली संपत्ती निवृत्तीनंतर पुरेल याची काळजी घेतल्यानंतर तुम्ही बिनधास्त हवे तसे जगण्यास मोकळे होऊ शकता.
वेळेआधीच निवृत्ती घेण्यासाठी नियोजन कसे कराल?
मागील काही वर्षांपासून वेळेआधीच निवृत्त होण्याचा एक ट्रेंड आला आहे. मनासारखे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य यातून मिळते. नोकरी किंवा व्यवसाय करत असताना अत्यावश्यक खर्च करून इतर उत्पन्न बचत आणि गुंतवणूक करून हे ध्येय तुम्ही साध्य करू शकता. कमावत्या वयात खर्चावर आवर घालण्याचे अवघड काम तुम्हाला साध्य करावे लागेल.
पहिली पायरी
तुम्हाला लवकर निवृत्त का व्हायचे आहे? याचे उद्दिष्ट निश्चित करा. हा प्रश्न स्वत:ला विचारा. लवकर निवृत्त होण्यासाठी गुंतवणूक, बचत आणि खर्च कमी करण्याचे नियोजन करा. आर्थिकदृष्या स्वावलंबी झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, याचाही विचार आधीच करून ठेवा. लवकर निवृत्त होण्यासाठी कोणकोणत्या खर्चात कपात करावी लागेल याची यादी तयार करा. अनावश्यक खर्च कसे टाळू शकता, ते पाहा.
दुसरी पायरी
काहीतरी मोठा निर्णय घेण्याचे नियोजन एका रात्रीत होत नाही. किती वर्ष बचत आणि गुंतवणूक करून निवृत्त होण्याचा विचार करणार आहात याचा विचार करा. निवृत्ती घेतल्यानंतर काय अडचणी उभ्या राहू शकतात, याचा अंदाज बांधा. त्यासाठी तरतूद आधीच करून ठेवा.
तिसरी पायरी
जेव्हा तुम्ही वेळेआधी निवृत्ती घ्याल तेव्हा तुमच्या जीवनशैलीत अचानक बदल होतील. हे बदल तुम्ही कसे हाताळाल याचे नियोजन करा. बदल स्वीकारण्यापूर्वी मानसिक तयारी करा.
लवकर निवृत्त होण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी काय कराल?
निवृत्त झाल्यानंतर तुमचा मासिक खर्च किती असू शकतो, याचा अंदाज बांधा. आणीबाणीसाठी आरोग्य विमा, जीवन विमा काढून ठेवा. पगारातील 50% रक्कम बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर द्या.
काम करत असताना तुमचे मासिक उत्पन्न वाढवण्यावर भर द्या. नोकरी करत असाल तर बचतीसोबतच चांगल्या पगाराची नोकरी शोधा. कौशल्य वाढवून चांगल्या पगाराची नोकरीही मिळवू शकता. तसेच फ्रिलान्सिंग करून मिळालेले अतिरिक्त पैसे गुंतवणूक करू शकता.
अनावश्यक खर्च टाळा - उपभोगवादी संस्कृतीत आपण गरज नसलेल्या अनेक गोष्टींसाठी खर्च करतो. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जंक फूड अशा गोष्टींवरील खर्च कपात करा. लवकर निवृत्त व्हायचे असेल तर खर्चात कपात करावीच लागेल. अत्यावश्यक खर्च वगळून इतर खर्चांना कात्री लावा. काही दिवस कठीण जातील, मात्र, नंतर सवय होऊन जाईल.
महागाईचा दर विचारात घेऊन जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. एकाच पर्यायात गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणुकीत वैविध्य ठेवा. इंडेक्स फंड, इटीएफ फंडात गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करताना कॅलक्युलेटेड रिस्क घ्या.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. याद्वारे तुम्हाला पॅसिव्ह इनकम मिळेल. तसेच दीर्घकाळात मालमत्तेची किंमतीही वाढेल.
तुमच्या बँक खात्याला ऑटोमॅटिक सेव्हिंग मोडमध्ये ठेवा. पगार झाल्यानंतर ठराविक रक्कम आधी बचत आणि गुंतवणुकीसाठी जाईल. उरलेल्या पैशातून मासिक खर्च भागवा. अल्प काळातील परताव्यापेक्षा दीर्घकाळाच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. बाजारातील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घ्या.
मागील एक वर्षात महागाईचा कसा भडका उडाला हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे भविष्यातही अशी परिस्थिती येऊ शकते. हे ध्यानात घेऊन आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. प्रत्येक वेळी तुम्हाला स्वत: सर्व निर्णय घेता येतीलच असे नाही. गुंतवणुकीबाबत सल्लागाराकडून मार्गदर्शन मिळेल. वेळेआधी निवृत्त होण्याचे नियोजन ही काही शंभर मीटरची रेस नाही. ही एक मॅरेथॉन रेस आहे. दीर्घकाळाचे योग्य नियोजन आणि शिस्त तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल.