कोणत्याही व्यक्तीचे निधन होणे ही दुखःद घटना असते. मात्र, व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरून कुटुंबातच वाद सुरू होतात. संपत्तीवरून कुटुंबातील वाद टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपत्तीची वाटणी. निधनापूर्वीच मृत्यूपत्र तयार केल्यास कुटुंबातील वादही टाळले जातात व संपत्तीची योग्यप्रकारे वाटणीही होत असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्वरित मालमत्तेच्या हक्काबाबत मृत्यूपत्र तयार करणे गरजेचे असते.
निवृत्तीनंतर तुमच्या मालमत्तेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन कसे करावे व मृत्यूपत्र तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
मालमत्ता व्यवस्थापन म्हणजे काय?
मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचे रक्षण कसे होईल? तुमच्या संपत्तीचे काय होणार? मालमत्तेची मालकी कोणाकडे जाईल? असे प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडले असतील. त्यामुळे मृत्यूपूर्वी मालमत्तेचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मृत्यूनंतर मालमत्तेची मालकी इतर व्यक्तींकडे जाऊ शकते.
मृत्यूनंतर मालमत्तेची मालकी योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मृत्यूपूर्वीच मालमत्तेची वाटणी करू शकता अथवा मृत्यूपत्र तयार करू शकता. मृत्यूपत्र तयार करताना आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.
मृत्यूपत्र बनवणे का गरजेचे?
निवृत्तीनंतर सर्वात प्रथम मृत्यूपत्र बनवणे गरजेचे आहे. मृत्यूपत्र बनवण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे कुटुंबातील वाद टाळणे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर घर, शेती, बँक खात्यातील रक्कम, विमा रक्कम, स्टॉक्स अशा मालमत्तेवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू होतात. त्यामुळे मृत्यूपत्रात स्पष्ट उल्लेख असल्यास असे वाद टाळले जाऊन संपत्तीचे योग्यप्रकारे विभाजन करणे शक्य होते.
याशिवाय, कुटुंबाला न्यायालयीन लढा द्यावा लागत नाही. अनेकदा वारसदाराचा उल्लेख नसल्यास कुटुंबाला न्यायालयीन लढ्यासाठी प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. याशिवाय, मुले अल्पवयीन असल्यास वारसदार म्हणून त्यांचा उल्लेख असल्यास भविष्यात त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही.
मृत्यूपत्र बनवताना या गोष्टी ठेवा लक्षात
मालमत्तेचे व्यवस्थापन | मृत्यूपत्र हे सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालकी कोणाकडे हस्तांतरण होईल, याबाबतचा कायदेशीर पुरावा असतो. परंतु, या मृत्यूपत्रात कोणत्या मालमत्तेचा उल्लेख करायला हवा, हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही मृत्यूपत्रात बँक खात्यातील रक्कम, तुमच्या नावावरील घर-शेती, स्टॉक्स, विमा रक्कम याचा उल्लेख करू शकता. तसेच, मालमत्तेची कशाप्रकारे योग्यरित्या व्यवस्थापन असेल हे ठरवू शकता. |
मालमत्तेची मालकी | मृत्यूपत्र हे एकप्रकारे आर्थिक नियोजनच असते. त्यामुळे यामध्ये मालमत्तेची मालकी कोणत्या व्यक्तीकडे जाईल, याचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. तसेच, संपत्तीतील विशिष्ट टक्केवारी एखाद्या व्यक्तीच्या नावावर करायची असेल तर त्याचाही उल्लेख असावा. मुलं अल्पवयीन असल्यास पालक म्हणूनही इतर व्यक्तींची नियुक्ती करू शकता. |
मृत्यूपत्राची करा नोंदणी | भविष्यात मृत्यूपत्राच्या सत्यतेबाबत कोणतेही समस्या निर्माण होऊ नये यासाठी त्याची अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. तुम्ही जिल्ह्यातील संबंधित उप-निबंधकाच्या कार्यालयात जाऊन मृत्यूपत्राची नोंदणी करू शकता. |