How to invest in Direct Mutual Fund?: म्युच्युअल फंड हा सिक्युरिटी मार्केटमध्ये गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना ठराविक कालावधीत चांगला परतावा मिळतो. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती महागाई किंवा मंदीच्या काळातही परतावा देत राहते. आजच्या काळात अनेक चांगले गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करत आहेत. डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या सोप्प्या पद्धती आहेत, ज्या नवीन गुंतवणूकदाराने लक्षात ठेवणे आवश्यक आहेत, ते आपण गुंतवणूक सल्लागार संध्या पाटोळे - वाघ यांच्याकडून जाणून घेऊयात.
म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना गुंतवणूकदारांना दोन प्रकारांमध्ये ऑफर केल्या जातात. एक नियमित योजना आणि दुसरी डायरेक्ट अर्थात थेट योजना असते. नियमित योजनेत म्युच्युअल फंड वितरकाला दिलेले कमिशन किंवा ब्रोकरेज समाविष्ट असते. तर, असा कोणताही खर्च डायरेक्ट योजनेशी जोडलेला नसतो. अशा परिस्थितीत हा लाभ थेट गुंतवणूकदारांना दिला मिळतो. म्युच्युअल फंड हाऊसेस डायरेक्ट गुंतवणूक करणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजना देतात. सेबीच्या निर्देशानुसार, म्युच्युअल फंड कंपन्यांनी सात वर्षांपूर्वीपासून डायरेक्ट योजना देऊ केल्या आहेत. थेट योजनेच्या बाबतीत, गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की त्यांनी स्वतःच योजना निवडणे आवश्यक आहे, असे संध्या पाटोळे - वाघ यांनी सांगितले.
डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग (Ways to Invest in Direct Plans)-
- अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन , तेथे उपलब्ध असलेल्या 'डायरेक्ट प्लॅन' या पर्यायावर क्लिक करून, देण्यात आलेला गुंतवणुकदार अर्ज फॉर्म भरावा आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या वेबसाईट व्यतिरिक्त ग्रोव्ह (Groww), ईटीमनी (ET Money) या प्लॅटफॉर्मवर जाऊनही ही प्रक्रिया करता येईल.
- आरटीए अर्थात रजिस्ट्रार किंवा हस्तांतरण एजंट (Registrar or transfer agents) यांच्या संस्थांच्या साहय्यानेदेखील डायरेक्ट गुंतवणूक करता येऊ शकते.
- ऑफलाईन गुंतवणूक करण्यासाठी, इनव्हेस्टमेंट कन्सल्टंट कार्यालयात जाऊन सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करता येऊ शकते.
- म्युच्युअल फंडच्या डायरेक्ट प्लॅनवर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुमचा सध्या सुरू असलेल्या रेग्युलर प्लॅनलाच, त्याच योजनेच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये रुपांतरीत करणे. यात एका योजनेतून विमोचन आणि दुसऱ्या योजनेत गुंतवणूक समाविष्ट होईल.
डायरेक्ट प्लॅन्ससह म्युच्युअल फंडातील कोणत्याही गुंतवणुकीसाठी केवायसी अनिवार्य असते. डायरेक्ट प्लॅनचे निव्वळ मालमत्ता मूल्य (Net asset value) नियमित प्लॅनपेक्षा जास्त आहे, या बाबी गुंतवणूक करताना गुंतवणुकदारांनी लक्षात ठेवाव्यात, असे पाटोळ - वाघ यांनी सांगितले.