भारतात गेल्याकाही वर्षात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आता शेअर मार्केटचे दरवाजे उघडे झाले आहे. अगदी कमी पैशांमध्ये यात गुंतवणुकीला सुरुवात करता येते. असे असले तरी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. यातील एक प्रमूख प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते का? या प्रश्नाचे सोपे उत्तर आहे ‘हो’. अल्पवयीन व्यक्ती देखील पालकांच्या सहमतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकते.
पालक अल्पवयीन मुलांच्यावतीने कोणत्याही माध्यमात गुंतवणूक करू शकतात. दिवसेंदिवस वाढत चालले शिक्षणाचा खर्च, मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये, असा विचार करून पालक गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. अनेकजण इक्विटीच्याबाबतीत ‘invest and forget’ हा नियम पाळतात. अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुम्हीही हा नियम पाळू शकता. कमी वयातच मुलांच्या नावाने गुंतवणुकीला सुरुवात केल्यास भविष्यात त्याचे जास्त फायदे मिळतील.
तुम्ही देखील अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी यात गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय आहेत? मुलांच्या नावाने खाते कसे उघडावे व यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.
अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते कसे उघडाल?
अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंड खाते उघडण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. ही प्रक्रिया अगदी बँक खाते उघडण्यासारखीच आहे. अल्पवयीन व्यक्तीला आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. त्यांच्यावतीने पालक अथवा कायदेशीर व्यक्ती सर्व निर्णय घेत असते. अल्पवयीन व्यक्तीचा म्युच्युअल फंड पोर्टफोलियो देखील पालकांच्या संमतीनेच सुरू करता येतो.
लक्षात घ्या की, अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने सुरू करण्यात आलेले म्युच्युअल फंड खाते हे संयुक्त नसते. यामध्ये केवळ एकाच व्यक्तीच्या नावाने गुंतवणूक करता येते. म्हणजेच पालकांना जरीही कायदेशीर अधिकार असले तरीही गुंतवणूक मात्र एकाच व्यक्तीच्या नावाने होते. तसेच, पोर्टफोलियोमध्ये गुंतवणूक करताना पालकांना नातेसंबंधाचा पुरावा द्यावा लागतो. पालक-अल्पवयीन मुलाचे नाते, अल्पवयीन मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असलेला पुरावा अशी विविध कागदपत्रे सादर करावी लागतात.
अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते?
अल्पवयीन मुलांच्या नावाने पालक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे केवायसी पूर्ण करताना ठराविक कागदपत्रे सादर करावी लागतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, ते जाणून घेऊयात.
- अल्पवयीन व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र.
- मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला.
- अल्पवयीन व्यक्तीचा पासपोर्ट
- पालक व मुलांचे नाते सिद्ध करणारा पुरावा.
- पालकांचे ओळखपत्र
तसेच, अल्पवयीन व्यक्तीची जन्मतारीख सिद्ध करणारा इतर कोणताही पुरावा व खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे असणे गरजेचे आहे. याशिवाय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतानाचे पेमेंट हे केवळ अल्पवयीन व्यक्ती, पालक यांच्या बँक खात्यातूनच स्विकारले जाते. त्यामुळे पालकांनी केवायसीचे पालन करणे आवश्यक आहे.
मुलांच्या नावाने एसआयपी व एसटीआय योजना सुरू करता येते का?
पालक मुलांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या म्युच्युअल फंड फोलिओमध्ये एसआयपी (systematic investment plan) आणि एसटीपी (systematic transfer plan) सुरू करू शकतात. मात्र, मुलं सज्ञान झाल्यानंतर ही प्रक्रिया बंद होईल व पालकांना कोणतेही व्यवहार पार पाडता येणार नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलंच सर्व व्यवहार पूर्ण करू शकतील.
अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे फायदे
आर्थिक सुरक्षा | अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने आर्थिक सुरक्षा प्राप्त होते. मुलांना भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पालकांनी आधीपासूनच गुंतवणूक सुरू करणे फायद्याचे ठरते. मुलं लहान असतानाच त्यांच्या नावाने सुरू केलेली गुंतवणूक भविष्यात त्यांना इतर कामासाठी उपयोगी ठरू शकते. तसेच, भविष्यात मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा करिअरसाठी कर्ज काढावे लागत नाही. |
संपत्तीत वाढ | कमी वयात गुंतवणूक सुरू करायला हवी, असा सल्ला प्रत्येकजण देतो. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे चक्रवाढीचा मिळणारा फायदा. लहान मुलांच्या नावाने सुरू केलेली छोटीशी गुंतवणूक ही भविष्यात मोठ्या रक्कमेत रुपांतरित होऊ शकते. त्यामुळे अगदी कमी रक्कमेत सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास नक्कीच फायदा होईल. |
उच्च परतावा | नियमित गुंतवणुकीच्या तुलनेत म्युच्युअल फंडच्या माध्यमातून उच्च परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. मुदत ठेवी अथवा सोन्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधून जास्त परतावा मिळतो. याशिवाय, तसेच, फंड मॅनेजरकडून याचे व्यवस्थापन हाताळले जात असल्याने जोखीम देखील कमी असते. |
मुलांच्या भविष्याचा मार्ग | प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्या दृष्टीने ते गुंतवणूक देखील करत असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलाचे भविष्याचा मार्ग सोपा होता. या गुंतवणुकीचा वापर ते उच्च शिक्षणासाठी व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. परदेशात शिकायला जाण्यासाठी अथवा व्यावसायिक मालमत्ता खरेदीसाठीही याचा उपयोग होईल. |
आर्थिक साक्षरता | मुलांच्या नावाने म्युच्युअल फंड खाते उघडणे व त्यात गुंतवणूक करणे, या प्रक्रियेमुळे त्यांनाही आर्थिकबाबींबाबत माहिती मिळते. या प्रक्रियेमध्ये मुलांचा सहभाग असल्यास आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यास मदत मिळते. त्यांना बचत, गुंतवणूक, खर्च अशा विविध संकल्पनांची ओळख करून देऊ शकता. यामुळे भविष्यात त्यांना आर्थिक जबाबदारी सांभाळताना फायदाच होईल. |
करबचत | मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये केलेली बचत ही कर वाचवण्याच्या दृष्टीनेही फायद्याची ठरते. मुलं अल्पवयीन असल्याने त्यांच्या नावावर केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर कर भरावा लागत नाही. मात्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमवलेल्या नफ्यावर कर भरावा लागेल. त्यामुळे मुलांचे वय कमी असतानाच गुंतवणुकीला सुरूवात करावी. |
विविधता आणि जोखीम कमी | म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत विविधता व लवचिकता असते. यात केलेल्या गुंतवणुकीची स्टॉक्स, बाँड्स अशा विविध माध्यमातून विभागणी केली जात असल्याने नुकसान होण्याचीही शक्यता कमी असते. |
अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे तोटे
आर्थिक निर्णयात सहभाग नाही | अल्पवयीन मुलांच्यावतीने म्युच्युअल फंडमध्ये पालक गुंतवणूक करत असतात. मुलं सज्ञान होईपर्यंत प्रत्येक आर्थिक निर्णय हा पालकच घेत असतात. त्यामुळे आर्थिक निर्णयात अल्पवयीन मुलांचा सहभाग फारसा नसतो. मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांचा या गुंतवणुकीवर अधिकार असतो. मात्र, या कालावधीत आर्थिक निर्णयाबाबत पालक व मुलांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते. |
हस्तांतरण प्रक्रिया | अल्पवयीन मुलांच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीतील सर्वात किचकट प्रक्रिया ही हस्तांतरणाची असते. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांच्याकडे गुंतवणुकीचा ताबा दिला जातो. मात्र, जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत खाते गोठवले जाते. गुंतवणूक हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत मुलांना कोणतेही आर्थिक निर्णय घेता येत नाही. |
गुंतवणुकीवर हक्क | मुलं सज्ञान झाल्यावर अचानक गुंतवलेली मोठी रक्कम त्यांच्या नावावर होते. मात्र, त्यांचा आतापर्यंत आर्थिकबाबीमध्ये कोणताही सहभाग नसेल अथवा आर्थिक साक्षरता नसल्यास अशावेळी त्यांच्याकडून या पैशांचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता आहे. मोठी रक्कम हाताळण्याची सवय नसल्यास पैशांचा चुकीचा वापरही होऊ शकतो. त्यामुळे मुलांना आर्थिक साक्षर बनवणे गरजेचे आहे. |
कर | मुलं अल्पवयीन असेपर्यंत सर्वसाधारणपणे गुंतवणुकीवर कोणताही कर भरावा लागत नाही. मात्र, मुलांनी 18 वर्ष पूर्ण केल्यावर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिळणाऱ्या परताव्यावर कर भरावा लागू शकतो. |
गुंतवणुकीचा इतर कामांसाठी वापर | पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, अनेकदा आपत्कालीन स्थितीमध्यै पैशांची गरज असल्यास इतर गुंतवणुकीच्या तुलनेत मुलांच्या म्युच्युअल फंडला प्राधान्य दिले जाऊ शकते. या गुंतवणुकीचा वापर इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. लक्षात घ्यायला हवे की मुलं 18 वर्षांची होण्याआधी पैसे काढल्यास पालकांना कर भरावा लागेल. तसेच, पालकांच्या बँक खात्यातून मुलांच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करता येतात. परंतु, पैसे काढताना ती रक्कम केवळ मुलांच्या बँक खात्यातच जमा होते. त्यामुळे मुलांचे बँक खाते नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. |
संयुक्त खाते नाही | अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड पोर्टफोलियोमध्ये संयुक्त खात्याची सुविधा नसते. म्हणजेच, मुलांसोबतच पालकांकडेही गुंतवणुकीची मालकी नसते. पालक हे केवळ कायदेशीर प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. त्यामुळे मुलांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गुंतवणूक त्यांच्या नावावर होते. |
गार्डियनशीपमध्ये (पालकत्व) बदल करण्याची प्रक्रिया काय आहे?
म्युच्युअल फंडबाबत मुलांच्यावतीने पालक निर्णय घेत असतात. खाते सुरू करतानाही पालकांची सहमती आवश्यक असते. परंतु, भविष्यात पालकांची सहमतीने अथवा पालकांचा मृत्यू झाल्यास गार्डियनशीपमध्ये बदल करावा लागू शकतो. गार्डियनशीपमध्ये बदल केल्यानंतर इतर व्यक्तींना अल्पवयीन मुलांच्या म्युच्युअल फंडाबाबतचे अधिकार प्राप्त होतात.
गार्डियनशीपमध्ये बदल करण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. सर्वातआधी अल्पवयीन मुलाच्या गार्डियनमध्ये बदलण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर व्यक्तीचे ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतील. तसेच, केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पालकांचा मृत्यू झाला असल्यास त्यासंबंधित कागदपत्रे देखील पुरावा म्हणून द्यावी लागतील. सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यावर पालकत्वाचे अधिकार इतर व्यक्तींना प्राप्त होतील व त्यानंतर मुलांच्या म्युच्युअल फंडबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना मिळतील.
या गुंतवणुकीवर भरावा लागतो का?
अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर पालकांना कर भरावा लागतो. आयकर कायदा, 1961 अंतर्गत मुलांच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा हा पालकांच्या उत्पन्नाशी जोडला जातो. यामुळे पालकांचे उत्पन्न वाढलेले दिसून येते. आई-वडिलांपैकी ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांना कर भरावा लागेल. मुलं सज्ञान झाल्यानंतर या गुंतवणुकीत मिळालेल्या नफ्यावर त्यांना कर भरावा लागतो. तसेच, पालकांचा मृत्यू झाला असल्यास अल्पवयीन मुलांना स्वतंत्र आयकर विवरणपत्र (ITR) भरावे लागेल. इतर कायदेशीर व्यक्ती मुलांच्यावतीने हे काम करू शकते.
मुलांनी 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर गुंतवणुकीचे काय होते?
मुलं अल्पवयीन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार हे पालकांच्या संमतीने केले जातात. 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर सर्व अधिकार मुलांना प्राप्त होतात. परंतु, यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. केवायसी व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाते गोठवले जाते व या कालावधीत व्यवहार करता येत नाही. म्युच्युअल फंड कंपनीद्वारे यूनिट होल्डरला अल्पवयीन व्यक्तीने 18 वर्ष पूर्ण केल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्रही पाठवले जाते.
पोर्टफोलिओचे स्टेट्स ‘minor’ ते ‘major’ करण्यासाठी खातेधारकाला काही प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठी सर्वात प्रथम MAM (Minor to Major) फॉर्म भरून द्यावा लागतो. पॅन कार्ड सादर करावे लागेल. बँक खात्याच्या स्थितीमध्ये देखील बदल करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवायसी प्रक्रियेसाठी पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, रद्द केलेला चेक व संपर्क क्रमांक इत्याही माहिती द्यावी लागेल.
गुंतवणूकदाराने दिलेली माहिती फोलिओकडून अपडेट केली जाईल. तसेच, यापुढील आर्थिक व्यवहारांचे अधिकार हे पालकांऐवजी गुंतवणूकदाराला मिळेल.