Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flight ticket refund process : विमान उड्डाण रद्द झाल्यास तिकीट रिफंड कसं मिळवावं? जाणून घ्या प्रक्रिया

Flight ticket refund process : विमान उड्डाण रद्द झाल्यास तिकीट रिफंड कसं मिळवावं? जाणून घ्या प्रक्रिया

Flight ticket refund process : विमानाचं उड्डाण रद्द झाल्यानंतर विमान कंपनीमार्फत आपल्याला किती पैसे रिफंड केले जातात, त्याची एकूण प्रक्रिया काय असते, याबद्दल अनेकांना माहिती पुरेशी नसते. त्यामुळे प्रवासी म्हणून आपले काय अधिकार आहेत, हे जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं.

अनेक कारणांनी विमान प्रवास रद्द (Flight cancellation) होतो किंवा त्याच्या वेळा बदलतात. अशावेळी आधीच बुक केलेल्या तिकीटाचे (Ticket) पैसे आपल्याला रिफंड मिळणं गरजेचं ठरतं. यासाठीचे काही नियम आहेत. त्या आधारावर विमान कंपन्यांना आपल्याला पैसे रिफंड (Refund) करावे लागतात. आता गो फर्स्ट (Go First) या विमान कंपनीनं आपली उड्डाणं रद्द केली आहेत. अशावेळी प्रवाशांनी आधीच बुक केलेल्या तिकीटांचं, पैशांचं काय होणार? ते त्यांना परत मिळतील का? किती परत मिळतील? असे अनेक प्रश्न समोर येतात. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

फ्लाइटचे नियम

विमानानं प्रवास करण्याचं नियोजन असेल तर अनेकवेळा फ्लाइटच्या वेळा बदलत असतात. काही कारणास्तव आपण फ्लाइटनं प्रवास करू शकत नसू तस अशावेळी विमान कंपन्या तुमच्या तिकीटाचा पूर्ण परतावाही देतात. मात्र यासाठी काही नियमांचं पालन होणं गरजेचं असतं. फ्लाइटशी संबंधित अनेक नियम आहेत. तिकीट बुक करतेवेळी हे खास नियम आपल्याला माहीत असायला हवेत. विमान वाहतूक नियामकाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Directorate General of Civil Aviation) विमान प्रवाशांसाठी काही अधिकार नमूद केले आहेत. तिकीट रिफंड आणि त्याच्याशी संबंधित परिस्थितीत त्याचा फायदा होतो.

डीजीसीएच्या वेबसाइटवर सविस्तर माहिती 

कोणत्याही कारणास्तव फ्लाइट रद्द झाली असेल आणि तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्या प्रवासाची व्यवस्था एअरलाइनमार्फत केली जाते. यासाठी एअरलाइन तुमच्याकडून तिकीटाच्या संदर्भानं कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही, असं डीजीसीएच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलंय.

रिफंड प्रोसेस - स्टेप बाय स्टेप

कोणत्याही विमान कंपनीत तुम्ही तिकीट बुक केलं असेल तर ऑनलाइन तिकीट कॅन्सल करणं तसंच रिफंड कसं मिळवावं, याची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ...

  1. सर्वप्रथम विमान कंपनीच्या वेबसाइटवर जावं
  2. 'Refund'च्या ऑप्शनवर क्लिक करावं
  3. तुमचे ‘PNR details’ Enter करावे. यात पीएनआर किंवा बुकिंग रेफरन्स नंबर आणि ई-मेल आयडी किंवा नाव टाकावं
  4. त्यानंतर ‘Cancel Booking’च्या ऑप्शनवर क्लिक करावं आणि ‘Proceed’ करावं
  5. रिफंडची पद्धत निवडावी आणि ‘Cancel Booking’वर क्लिक करावं
  6. Itineraryमध्ये जाऊन तुमचे डिटेल्स चेक करावेत आणि नंतर ‘Proceed’वर क्लिक करावं

मिळतो पूर्ण रिफंड

तुम्ही बुक केलेली फ्लाइट रद्द झाली तर अशावेळी एअरलाइनमार्फत तुमची दुसऱ्या कोणत्यातरी फ्लाइटमध्ये व्यवस्था केली जाते ज्या फ्लाइटचा वेळ कदाचित वेगळा असू शकतो. मात्र संबंधित वेळेत तुमची गैरसोय होत असेल आणि तुम्हाला पर्यायी व्यवस्था केलेल्या फ्लाइटमधून प्रवास करायचा नसेल तर अशावेळी तुम्ही संबंधित ऑफर नाकारू शकता. त्यानंतर एअरलाइनला तुमचे पैसे तुम्हाला परत करावे लागतात. एअरलाइन CAR कलम 3, सिरीज M, पार्ट 2 अंतर्गत तुमचं भाडं परत करण्याची म्हणजेच रिफंड प्रोसेस सुरू करेल.

नाश्ता, जेवणाची व्यवस्था

ज्या विमानानं आपण प्रवास करणार आहोत त्याचा प्रवास काही कारणास्तव रद्द केला असेल आणि तो रद्द करण्याआधीच विमानतळ प्रशासनाला कळवलं असेल तर यासंबंधातला एक नियम महत्त्वाचा आहे. रद्द केलेली फ्लाइट, आगामी फ्लाइट यादरम्यानचा जो वेळ असतो म्हणजेच पर्यायी फ्लाइट येईपर्यंत विमानतळावर थांबणार असाल तर तुमच्या नाश्ता, जेवणाची व्यवस्था एअरलाइन्सला करावी लागते.

ओव्हरबुकिंग आणि रिफंड

विमान कंपन्यांमार्फत अनेकवेळा ओव्हरबुकींग केली जाते. सीट्स रिकामे राहू नयेत, यासाठी ठराविक मर्यादेपर्यंत ही उड्डाणं ओव्हरबुक केली जातात. अशा परिस्थितीत बुक केलेल्या काही प्रवाशांनी आपली तिकीटं कॅन्सल केली तरी विमानातल्या जागा रिकाम्या राहत नाहीत. कधीकधी विमान कंपनी तुम्हाला विमानात बसण्यास, बोर्डिंग करण्यास नकार देऊ शकते. तुम्ही तुमची सीट स्वत:हून सोडली तर एअरलाइनकडून तुम्हाला अतिरिक्त सुविधा मिळू शकतात. तुम्हाला तुमची जागा सोडायची नसेल तर एअरलाइन नियमानुसार तुम्हाला योग्य तो मोबदला देते.