गो फर्स्ट (Go First) ही विमान वाहतूक क्षेत्रातली एक महत्त्वाची कंपनी आहे. वाडिया ग्रुपकडे (Wadia group) त्याची मालकी आहे. मात्र सुरू असलेल्या घडामोडींवरून कंपनीनं स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं दिसून येतंय. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलसमोर स्वैच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी कंपनीनं अर्जही दाखल केलाय. कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी याविषयी सविस्तर माहिती दिलीय. प्रॅट अँड व्हिटनीनं (Pratt & Whitney's) इंजिन पुरवलं नाही. त्यामुळे जवळपास 28 विमानं ग्राउंड करावी लागली आहेत. यामुळे निधीचं संकट निर्माण झालंय. यासंदर्भात विमान कंपनीनं सरकारला माहिती दिलीय. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) सविस्तर अहवालदेखील सादर करणार आहे, असं ते म्हणाले. बीक्यू प्राइमनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
रोख रकमेची तीव्र टंचाई
पेट्रोलियम कंपन्यांची थकबाकी भरली नसल्यामुळे गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइननं 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणं रद्द केल्याचं वृत्त समोर आलं होतं. गो फर्स्टला रोख रकमेची तीव्र टंचाई भासत आहे. याशिवाय, प्रॅट अँड व्हिटनी इंजिनच्या वारंवार समस्या आणि पुरवठ्यामुळे अर्ध्याहून अधिक विमानांची उड्डाणं ग्राउंड करण्याची नामुष्की कंपनीवर ओढवलीय. ही इंजिनं एअरबस ए 320 निओ (Airbus A320 Neo) विमानांना वीजपुरवठा करतात.
#GoFirst forced to file bankruptcy due to 'enormous damage' by engine supplier.
— BQ Prime (@bqprime) May 2, 2023
Read the full story: https://t.co/w9G0Yj5NSk pic.twitter.com/e3berag3YH
स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरचा शोध सुरू
वाडिया ग्रुपची ही विमान कंपनी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर शोधत आहे. संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चाही सुरू आहे. ऑइल मार्केटिंग कंपनी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन कॅश अँड कॅरी मोडवर आहे. याचा अर्थ चालवल्या जाणाऱ्या फ्लाइटच्या संख्येसाठी दररोज या कंपनीला पैसे द्यावे लागत आहेत. पैसे न दिल्यास विक्रेता व्यवसाय बंद करू शकतो, असं मान्य करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी किंगफिशर ज्या अवस्थेतून गेली होती, तशीच अवस्था गो फर्स्टची झाल्याचं दिसून येतंय. मात्र गो फर्स्टकडून याप्रकरणी कोणतंही अधिकृत वक्तव्य अद्याप आलेलं नाही.
'प्रॅट अँड व्हिटनी'विरुद्ध गुन्हा दाखल
गो फर्स्ट कंपनी इंजिन बनवणाऱ्या कंपनीविरोधात आक्रमक झालीय. गो फर्स्टनं प्रॅट अँड व्हिटनी विरुद्ध जिंकलेल्या लवाद न्यायालयाच्या निवाड्याची अंमलबजावणी करण्यासाठी डेलावेअर फेडरल कोर्टात यूएस बेस्ड इंजिन मेकर कंपनीविरुद्ध खटला दाखल केलाय. प्रॅट अँड व्हिटनी या विमान कंपनीला इंजिन पुरवावे लागतील, असं या निर्णयात म्हटलं होतं. आता कंपनीनं तसं न केल्यास विमानसेवा बंद होण्याचा धोका निर्माण झालाय. इमर्जन्सी इंजिन उपलब्ध न झाल्यास गो फर्स्टला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, असं 30 मार्चच्या निर्णयात म्हटलंय. हे नुकसान इतकं मोठं असू शकतं जे भरून काढणंदेखील कंपनीसाठी कठीण असणार आहे.
9 विमानांचं भाडेपट्टीचं पेमेंट बाकी
कंपनीनं 31 मार्चपर्यंत 30 विमानं ग्राउंड केली होती. त्यातल्या 9 विमानांचं भाडेपट्टीचं पेमेंट बाकी आहे. कंपनीच्या ताफ्यात एकूण 61 विमानं आहेत. या 61 पैकी 56 हे ए 320 निओ (A320 Neo) आणि 5 ही ए 320 सीईओ (A320CEO) आहेत. कंपनीनं सध्याच्या उन्हाळ्यातलं वेळापत्रक जारी केलं होतं. आठवड्यातून 1,538 उड्डाणं चालवण्यासंदर्भातलं हे वेळापत्रक होतं. हे प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा 40नं कमी आहे. विमानाचं भाडं वाढलं की प्रवाशांच्या महसुलात तोटा सहन करावा लागतो. दरम्यान, 26 मार्चला यंदाचा हंगाम सुरू झाला असून तो 28 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ही सर्व माहिती गो फर्स्टच्या वेबसाइटवर देण्यात आलीय.
मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट तोटा
कंपनीला उतरती कळा खरं तर मागच्या वर्षीपासूनच लागल्याचं दिसून येतंय. जुलै 2022पासून कंपनीचा बाजारातला हिस्सा घसरत चाललाय. आता तर विमान ग्राउंड करावी लागत आहेत. 1.27 दशलक्ष प्रवासी असताना मे 2022मध्ये 11.1 टक्क्यांच्या उच्चांकावरून 963,000 प्रवासी घेऊन फेब्रुवारीमध्ये बाजारपेठेतील हिस्सा 8 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांची संख्या घटली म्हणजे महसुलावर थेट परिणाम. यामुळेच कंपनीच्या आर्थिक स्थितीवर याचा गंभीर परिणाम झालाय. नियामक फायलिंगनुसार, एअरलाइननं आर्थिक वर्ष 2023मध्ये 218 दशलक्ष डॉलरचा निव्वळ तोटा नोंदवलाय. मागच्या वर्षी हा तोटा 105 दशलक्ष डॉलर होता. म्हणजे यंदा तो दुप्पट झालाय.