Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण तुम्हाला 30 सप्टेंबरच्या आत म्युच्युअल फंडसाठी नॉमिनीचे नाव द्यायचे आहे. नाहीतर 1 नोव्हेंबरपासून तुमचा तो फंड आणि त्यामधील गुंतवणूक फ्रीज होईल. याबाबत सेबीने पत्रक काढून तशा सूचना म्युच्युअल फंड हाऊसला दिल्या आहेत.
आज आपण म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी ऑनलाईन नॉमिनेशन कसे द्यायचे हे समजून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्व फंडासाठी नॉमिनी ॲड करू शकता.
ऑनलाईन नॉमिनी कसे ॲड करायचे?
म्युच्युअल फंडमध्ये CAMS आणि KFintech या वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन नॉमिनी ॲड आणि अपडेट करता येते. ते कसे करायचे, यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा.
CAMS Online
- CAMS Online वेबसाईटच्या होमपेजवर Change of Nomination फॉर्मवर क्लिक करा.
- गुंतवणूकदाराचा पॅनकार्ड क्रमांक टाका.
- पॅनकार्ड टाकल्यानंतर ओटीपी क्रमांक मोबाईल की ईमेलवर हवा आहे. याबाबत माहिती द्या.
- मोबाईल किंवा ईमेल दोन्हीपैकी एकावर ओटीपी येईल, तो टाकून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या फंडांची नावे दिसतील. ती सिलेक्ट करून Next बटणावर क्लिक करा.
- इथे तुम्हाला नॉमिनीचे नाव ॲड करणे, नॉमिनी बदलणे/अपडेट करणे असे पर्याय दिसतील. त्यापैकी एकाची निवड करा.
- नॉमिनीचा पॅन नंबर, जन्मतारीख, गुंतवणूकदाराशी असलेले नाते आणि नॉमिनेशनचे प्रमाण टक्क्यांमध्ये टाका.
- त्यानंतर सर्व माहिती चेक करून सबमिट करा. पुन्हा एक ओटीपी येईल. तो टाकून तुमची नॉमिनीची प्रक्रिया पूर्ण करा.
CAMS Online वरून आदित्य बिर्ला, डीएसपी म्युच्युअल फंड, फ्रॅन्कलीन टेम्पलटन, एचडीएफसी, एचएसबीसी, आयसीआयसीआय, आयडीएफसी, आयआयएफएल, कोटक महिन्द्रा, महिन्द्रा ॲसेट, एसबीआय, पीपीएफएएस, श्रीराम ॲसेट, टाटा म्युच्युअल फंड आणि युनिअन ॲसेट या 15 कंपन्यांमधील फंडांचे नॉमिनी बदलता किंवा नव्याने ॲड करता येतात.
KFintech
- KFintech वेबसाईटला भेट द्या.
- गुंतवणूकदाराचा पॅन क्रमांक टाका आणि दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
- ओटीपीसाठी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी निवडा.
- जनरेट ओटीपीवर क्लिक करा आणि तो व्हॅलिडेट करा.
- आता उपलब्ध फोलिओमधून एकेकाची निवड करा आणि नॉमिनीची माहिती भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा आणि पुन्हा एकदा ओटीपी व्हेरिफाय करून प्रक्रिया पूर्ण करा.
KFintech वेबसाईटवरून ॲक्सिस, बीएनपी, बँक ऑफ इंडिया, कॅनरा रोबेको, इड्लवाईस, आयडीबीआय, इंडिया बुल्स, इनव्हेसको, आयटीआय ॲसेट, जे एम फायनान्शिअल, एलआयसी, मिराई ॲसेट, मोतीलाल ओसवाल, नवी म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया, पीजीआयएम इंडिया, क्वान्ट, क्वॉन्टम ॲसेट, सॅमको, सुंदरम, तौरस ॲसेट, ट्रस्ट म्युच्युअल आणि युटीआय म्युच्युअल फंड अशा 23 कंपन्यांच्या नॉमिनीची माहिती अपडेट किंवा ॲड करता येते.