आजकाल अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही की, ती ऑनलाइनवर उपलब्ध नाही. आपण उत्पन्न मिळवू शकता, खरेदी, बचत, विम्यापासून गुंतवणूक देखील ऑनलाइनच्या माध्यमातून केली जात आहे. एवढेच नाही तर आपण इंटरनेटवर इच्छापत्र, मृत्यूपत्र किंवा वारसापत्र देखील तयार करु शकता.
* इ-विल रायटिंग सर्व्हिसेसच्या मदतीने आपण ऑनलाइनवर इच्छापत्र तयार करु शकता. एनएसडीएल.इ.गर्व्हनस इंन्फ्रास्क्ट्रचरसारखी अनेक संकेतस्थळे कोणत्याही व्यक्तिला ऑनलाइनवर इच्छापत्र तयार करण्यास मदत करतात.
* इ-विल सेवेमागचा उद्देश इच्छापत्र सुटसुटीतपणे लिहता यावे हा आहे. ज्याप्रमाणे ऑनलाइन ट्रेडिंगच्या मदतीने इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. त्यानुसार इ-विल सेवा इच्छापत्र लिहण्यासाठी मदत करते.
* ई-विल कसे तयार करावे?
* ई-विलचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी ग्राहकांना संंबधित सेवेच्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागते. तेथे नमूद असलेल्या रकान्यात माहिती भरावी लागते. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे कायदेतज्ञ हा इच्छापत्र तयार करतो आणि ते इच्छापत्र आपल्याला ई-मेल किंवा पोस्टाने ग्राहकापर्यंत पोहचवले जाते. ही सेवा ऑनलाइन असल्याने ग्राहक आपल्या सोयीनुसार माहिती भरु शकतो. त्याचवेळी ड्राफ्टला सेव्ह देखील करु शकतो.
* तसेच त्यात बदलही करता येणे शक्य आहे. कधीही आणि केव्हाही आपल्या इच्छाप्रमाणे माहिती बदल करु शकतो. अर्थात या बदलाला निश्चित कालावधी देण्यात आला आहे. इच्छापत्र लिहण्यासाठीची गरज आणि कायदे हे समाजनिहाय वेगळे असू शकतात. यासंदर्भात ई-विल सेवा देणारी कंपनी सजग राहते. संबंधित समाजाच्या, धर्माच्या वारसाहक्क कायद्यानुसार ई-सेवा माहिती उपलब्ध करुन देत असते.
* ई-सेवा देणार्या कंपनीकडे कायदे तज्ञ असल्याने इच्छापत्र तयार करताना ते संपूर्णपणे सहकार्य करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार इच्छापत्राची पूर्तता करतात.
* बदलत्या परिस्थितीनुसार इ-विलमध्ये एखादा व्यक्ती भौतिक संपत्तीबरोबरच डिजिटल आणि बौद्धिक संपत्तीचा देखील उल्लेख करु शकतो. ही प्रक्रिया ग्राहकाने माहिती भरल्यानंतर पूर्ण केली जाते आणि त्यासाठी किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो.
* ई-विलमध्ये आपण माहिती भरल्यानंतर एक कच्चे इच्छापत्र तयार करुन आपल्याकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात येते. इच्छापत्रात कोणतीही चूक राहू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. प्राथमिक इच्छापत्रात काही चुका राहिल्यास त्यात बदल केल्यानंतर भविष्यात अडचणी येत नाहीत. ग्राहकाने इच्छापत्रातील प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. जेणेकरून आपल्याला काय मांडायचे आहे, ते वास्तविकपणे कागदावर उतरले आहे काय, याची खातरजमा करणे अनिवार्य ठरते. जर चूक राहिल्यास आपण त्यात बदलही करु शकतो. नव्याने तयार केलेले इच्छापत्र आपल्याला पाठविले जाते.
* काही कारणास्तव जर आपली मूळ प्रत हरविल्यास आपल्याला नव्याने संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागेल. या सेवेबरोबरच काही अतिरिक्त सेवाही प्रदान करण्यात आल्या आहेत. अर्थात त्या आवश्यक नाहीत. इच्छापत्राची नोंदणी करणे किंवा इच्छापत्रासाठी एक्झिक्युटर निश्चित करणे आदी.
* ई-विल सुरक्षित आहे का?: इ-विल प्रक्रिया ही कोणत्याही ऑनलाइन ट्रेडिंगप्रमाणे सुरक्षित आहे. ग्राहकाकडून दिल्या गेलेल्या माहितीला डाटाबेसमध्ये इनक्रिप्ट करुन सुरक्षित केले जाते. इ-विल तयार झाल्यानंतर ते ग्राहकांपर्यंत पोचले जाते. त्याची संपूर्ण माहिती डाटाबेसमधून कायमस्वरुपी डिलिट केली जाते.
* खर्च किती ?: इ-विल सेवा ही ऑनलाइन इच्छापत्राला प्रोत्साहित करण्यासाठी कार्यान्वित केली आहे. एखादा व्यक्ती पारंपारिकरित्या देखील इच्छापत्र तयार करु शकतो. जर एखादा व्यक्ती वकिलामार्फत इच्छापत्र तयार करत असेल तर त्यासाठी किमान 20 हजार रुपयाचा खर्च येतो. अर्थात एखादे प्रकरण खूपच किचकट असेल आणि मालमत्तेविषयी वाद असतील तर वकिलाशी थेट बोलून इच्छापत्र तयार करणे हे कधीही उत्तम. मात्र वारशाबद्धल आणि मालमत्तेबद्धल काही वाद नसतील तर ऑनलाइन विल हा चांगला पर्याय मानला जातो. त्याचा खर्च अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. ई-विल घरपोच पाठविण्याची मागणी ग्राहकमंडळी करतात, अशावेळी घरपोच सेवेसाठी शुल्कही आकारले जाते.
इ-विल तयार करण्याची प्रक्रिया
* संकेतस्थळावर लॉग इन करुन आयडी तयार करावा आणि नोंदणी करावी.
* ऑनलाइनवर शुल्क भरावे. नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डने देखील पैसे भरता येतात.
* आपली जात, वर्ग, लिंग, धर्म आदींची माहिती भरावाी तसेच अनिवासी भारतीय किंवा भारतीय नागरिक याचाही उल्लेख करावा लागतो.
* रचनेनुसार माहिती भरावी. कुटुंबातील सदस्यांची संख्या, मालमत्ता आणि आपण कुटुंबात कशा रितीने विभागणी करु इच्छिता याचेही विवरण हवे.
* सबमिट किंवा जनरेट विलवर क्लिक करा.
* आपल्याला इच्छापत्राचा नमुना मिळेल आणि त्याचे वाचन करुन बदल करता येतो.
* इच्छापत्र पूर्ण झाल्यानंतर मेलवर किंवा पोस्टाने त्याची हार्डकॉपी घरापर्यंत पोचते. त्याचबरोबर इच्छापत्रावर स्वाक्षरी करण्याची आवश्यक माहिती देखील द्यावी लागेल.
* इच्छापत्रावर साक्षीदाराच्या सह्या घेऊन त्यास कायदेशीर संरक्षण देऊ शकता.