Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wealth-Building Strategy: वयाच्या चाळीशीत संपत्ती कशी निर्माण करायची, जाणून घ्या फॉर्म्युला

How to build wealth

Image Source : www.wiseradvisor.com

wealth-building strategy: वयाची चाळीशी हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा, आपली बलस्थाने आणि आपल्या आर्थिक संपत्तीचा एक अंदाज आलेला असतो. त्या अंदाजावर आधारित आपल्या संपत्तीत वाढ कशी करू शकतो. हे आपण जाणून घेणार आहोत.

वयाची चाळीशी हा प्रत्येक व्यक्तीला एक नैसर्गिक इशारा असतो. माणूस चाळीशीत पोहोचला की, त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक बंधने येतात. काही जणांना आजार बळावतात. तर काही जण त्यावर मात करतात. चाळीसीमध्ये माणसाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते. त्यांना मुलांच्या भविष्याचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर या वयात त्यांना एक आर्थिक स्थैर्य अपेक्षित असते. त्यासाठी धडपड सुरू असते. तर आज आपण वयाच्या चाळीशीतील आर्थिक स्थैर्याची धडपड कशी संपवायची याबाबत जाणून घेणार आहोत.

वयाच्या चाळीशीत संपत्ती निर्माण करा

वयाची चाळीशी हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा, आपली बलस्थाने आणि आपल्या आर्थिक संपत्तीचा एक अंदाज आलेला असतो. त्या अंदाजावर आधारित बरेच जण पुढील आयुष्याचे नियोजन करतात. यामध्ये आर्थिक नियोजन आणि उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करणे आवश्यक असते. तर आज आपण वयाच्या चाळीशीत कशाप्रकारे संपत्ती निर्माण करू शकतो किंवा आहे त्या संपत्तीत वाढ कशी करू शकतो. हे पाहणार आहोत.

सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या

परिस्थितीमध्ये बदल करायचा असेल, तर सर्वप्रथम त्याचा आढावा घेणे गरजेचे असते. समजा आपल्या आर्थिक स्थितीमध्ये आपल्याला बदल अपेक्षित असेल तर आपली सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण आतापर्यंतच्या 40 वर्षांच्या आयुष्यात आपण कोणत्या टप्प्यावर पोहोचलो आहोत आणि इथून पुढे आपल्याला कोणत्या टप्प्यावर जायचे आहे. याचा अंदाज घेण्यासाठी सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे.

आर्थिक स्थितीचा आढावा घेताना आपल्यावर कोणती कर्जे किंवा दायित्वे आहेत का? ती पूर्ण करण्याचे आपले पुढील नियोजन काय? याचा विचार होणे अपेक्षित आहे. यामध्ये एकूण उत्पन्नापैकी बचत किती होते आणि खर्च किती होतो. याचा अंदाज घेणे अपेक्षित आहे.

आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा

आपल्याला स्वत:ला आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज आला की, त्यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे सोपे जाते. अन्यथा रुटीन लाईफ जगताना काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी बचत करणे विसरून जातो. ते होऊ नये. यासाठी काही आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित केलीच पाहिजे. त्यामध्ये होम लोन पूर्ण करणे, मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणे किंवा मुलीच्या लग्नासाठी एक ठराविक रक्कम जमा करणे, अशी कोणतीही उद्दिष्ट्ये असू शकतात. पण ती ठरवणे तितकेच गरजेचे आहे.

दैनंदिन खर्च कमी करा

एकदाची तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये ठरली की, त्यानुसार पैशांची बचत करण्याचे नियोजन सुरू केले पाहिजे. यामध्ये सर्वप्रथम डेली लाईफमध्ये होणारे वायफळ खर्च बंद करण्यावर किंवा ते कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे तुमची आपोआप बचत होण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही काही खर्चाची यादी करून ते किती गरजेचे आहेत. याचा आढावा घेऊन त्यामध्ये कपात करू शकता किंवा ते बंददेखील करू शकता.  

लाईफस्टाईलमध्ये बदल करा

वाढत्या किंवा बदलत्या वयानुसार लाईफस्टाईलमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. काळानुसार शरीरात बदल होत असतात आणि शरीराला सूट होतील असे नवीन बदल स्वीकारावे लागतात. यासाठी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींवर बंधने आणावी लागतात किंवा काही गोष्टी नव्याने सुरू कराव्या लागतात. अर्थात यामुळे तुमची बचत होण्यासच मदत होते. कारण शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित असेल तरच तुम्ही पुढची लढाई बिनधास्तपणे लढू शकता. संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण व्यवस्थित असणे तितकेच गरजेचे आहे. 

उत्पन्नाचे इतर पर्याय शोधा

आयुष्यातील एक विशिष्ट टप्पा ओलांडला की, अनेक गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. खासकरून आपल्यातील आत्मविश्वास, आपल्या चांगल्या-वाईट गोष्टी किंवा एखाद्या क्षेत्रातील आपले प्रभुत्व. याचा फायदा घेत यातून उत्पन्नाचे इतर पर्याय निर्माण केले पाहिजेत किंवा शोधले पाहिजेत. ज्यातून तुम्हाला अधिक पैसे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला डबल मेहनत करण्याची गरज नाही. पण अनुभवाने तुमच्याजवळ जे काही एक्सपर्टाइझ आले आहे. त्यातून तुम्ही नक्कीच अर्थाजन मिळवू शकता.

गुंतवणुकीचे नियोजन करा

गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे हा पर्सनल फायनान्समधील खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण अनेक जण मेहनतीने पैसे कमावतात. पण तो वाढवण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने मिळवलेले पैसे असेच खर्च होतात. प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. या नियोजनामध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडणे, त्या गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करणे, गरजेचे असते. तसेच गुंतवणुकीतून योग्यवेळी बाहेर पडणे हा सुद्धा गुंतवणूक नियोजनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

स्वत:चे बजेट तयार करा

स्वत:चे किंवा कुटुंबाच्या खर्चाचे बजेट तयार करून त्यानुसार खर्च करणे ही एक खूप चांगली पद्धत आहे. देशाचे किंवा कोणत्याही राज्याचे, पालिकेचे बजेट असेच काम करते. यामध्ये जमा होणारे उत्पन्न आणि त्यातून खर्च, बचत, इतर किरकोळ कामे, मोठी कामे, अचानक येणारे खर्च यांचा समावेश असावा आणि या बजेटला धरूनच खर्च करण्यावर भर द्यावा. यामुळे स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला एक आर्थिक शिस्त लागते.

अशाप्रकारे वयाच्या चाळिशीत आलेली व्यक्ती स्वत:चे आर्थिक नियोजन करून आपल्याला संपत्तीची बचत करून त्यात वाढदेखील करू शकते. प्रत्येकवेळी संपत्ती निर्माण करूनच त्यात वाढ होते, असे नाही. काही वेळेस उत्पन्नात वाढ झाली की, खर्चही वाढतात आणि पुन्हा जमा-खर्चाचे तेच प्रमाण राहते. ते होऊ नये, यासाठी गुंतवणुकीचे वरीलप्रमाणे योग्य नियोजन करूनही संपत्तीत वाढ करता येऊ शकते.