Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Monthly Budget: पैशांची उधळपट्टी टाळण्यासाठी मासिक बजेट तयार करा; त्यासाठी या 8 स्मार्ट टिप्स

Monthly Budget

तुम्हाला जर असे वाटत असेल उत्पन्नातून महिन्याच्या शेवटी काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत. तर तुम्हाला खर्चाचे बजेट तयार करण्याची गरज आहे. आधी बचत आणि गुंतवणूक त्यानंतर खर्च या सुत्राचा वापर करून तुम्ही पैसे वाचवू शकता. अनावश्यक खर्च कोणते ते टाळून अधिकची बचत होऊ शकते. तुमचे मासिक खर्च लिहून काढा. बजेट तयार करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स या लेखात दिल्या आहेत.

Monthly Budget: उत्पन्नातून खर्च किती करावा, हे प्रत्येकाच्या गरजांवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. मात्र, पगार कमी असला तरी स्वयंशिस्त आणि स्वत:वर ताबा ठेवून तुम्ही बचत आणि गुंतवणूक करू शकता. नाहीतर चांगले उत्पन्न असतानाही पैसेच शिल्लक राहत नाहीत, अशी ओरड करणारे तुम्ही पाहिलेच असतील. त्यासाठी मासिक बजेट गरजेचे आहे. दरमहा काही खर्च अत्यावश्यक असतात. तर काही खर्च तुम्ही गरज नसतानाही करता. याची मोठी यादी आहे. पैशांची उधळपट्टी टाळून सेविंग वाढवायची असेल तर मासिक बजेट तयार करा. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

उत्पन्नाचे स्रोत कोणते?

तुमच्या कुटुंबाचे दरमहा उत्पन्नाचे कोणकोणते स्रोत आहेत हे सर्वप्रथम निश्चित करा. यामध्ये नोकरी करत असाल तर पगार सोबतच जर तुम्ही फ्रिलान्सिंग करत असाल तर त्यातून दरमहा किती पैसे येतात याचा हिशोब करा. तसेच गुंतवणुकीतून मिळणारा परतावा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची मासिक कमाई एकत्र करा. यातून मासिक उत्पन्नाची एक निश्चित आकडेवारी मिळेल.

खर्चाचा ताळेबंद आखा

मासिक कोणत्या गोष्टीसाठी खर्च होतो याचे रिकॉर्ड ठेवा. यासाठी बाजारात अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. तसेच एक्सल शीटवरतीही तुम्ही हिशोब टिपून ठेवू शकता. यातून तुम्ही दरमहा कोणत्या गोष्टीवर किती पैसे खर्च करता याचा स्पष्ट अंदाज येईल. जर शॉपिंग, बाहेरचे खाणे, मनोरंजन यावर खर्च जास्त होत असेल तर ते तुमच्या लक्षात येईल. तुमच्या खर्चाचे एक्सलमध्ये ग्राफही तयार करता येतात. व्हिडिओ पाहून तुम्ही ते शिकू शकता. त्याद्वारे अनावश्यक खर्च चटकन लक्षात येतो.

आर्थिक ध्येय ठरवा 

व्यवसाय किंवा पगारातून दरमहा जे काही उत्पन्न मिळते त्यातून तुमचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरवून घ्या. मासिक खर्च करण्याआधी गुंतवणूक करा. उरलेल्या पैशातून खर्च करा. मुलांचे शिक्षण, घर, गाडी, घरगुती उपकरणांची खरेदी यासाठी ध्येय ठरवा. गुंतवणुकीचे ध्येय स्पष्ट नसेल तर कोणत्या पर्यायात गुंतवणूक करावी हे सुद्धा कळत नाही.

खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा

दरमहा काही खर्च अनिवार्य असतात तर काही खर्च केले नाही तरी फरक पडत नाही. मात्र, आपण स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पैसे खर्च करतो. घराचे रेंट, वीज, गॅस, मोबाईल, इंटरनेट यांसारखे खर्च तुम्ही कमी करू शकत नाही. मात्र, अचानक केलेली शॉपिंग, बाहेरचे खाणे, मनोरंजन यावरील खर्च कमी करू शकता. अनेकांकडे अशा अनेक वस्तू असतात, ज्या त्यांनी खरेदी केल्यानंतर त्याचा कधीही वापर केलेला नसतो. अशा गोष्टी ओळखा त्यांची यादी करा आणि जेव्हा कधी बाहेर जाल तेव्हा या वस्तूंची खरेदी टाळा. कपाटामध्ये असे अनेक कपडे असतात ज्यांना एकदा किंवा दोनदा घातल्यानंतर वर्षभर हातही लावलेला नसतो. गॅझेटच्या बाबतीतही तेच. त्यामुळे स्वत:साठी किंवा मित्रांसोबत शॉपिंगला गेल्यानंतर अनावश्यक खरेदी टाळा.

budget-monthly.jpg

बजेट प्लॅन करा

तुमच्या महिन्याभराच्या खर्चाचे नियोजन करा. जसे की, घरभाडे, विविध बिल्स, मनोरंजन, पुस्तके, गुंतवणूक यासाठी किती खर्च होतो याचे नियोजन करा. जर बजेट तयार केले नाही तर तुम्ही किती पैसे खर्च करत आहात, हे लक्षात येत नाही. मात्र, महिन्याच्या शेवटी बँकेचे खाते रिकामे झाल्याचे दिसते.

खर्च कमी करण्याचे उपाय शोधा

बजेट शॉपिंग करण्यासाठी ऑनलाइन ऑफर आल्यानंतरच शॉपिंग करा. तसेच बाहेर खाणे, अनावश्यक खरेदी टाळा. अनेक वेळा सेकंड हँड वस्तू घेतलेलेही फायद्यात ठरते. त्यामुळे नवी वस्तू घेणे टाळून तुम्ही पैसे वाचवू शकता. एखाद्या गोष्टीची लगेच गरज नसेल तर चांगली ऑफर येऊपर्यंत वाट पाहा. आवश्यक खर्च करून इतर बाबींमध्ये तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे.

क्रेडिट कार्डचा कमी वापर

क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला जास्त खर्च करण्यास भाग पाडतो. अनेक वेळा क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर्स असतात. त्याला बळी पडून आपण वस्तू खरेदी करतो. त्यापेक्षा कॅश किंवा डेबिट कार्डचा वापर करा. क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला कायम EMI वर वस्तू विकत घेण्याची सवय लागू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड न वापरलेलेच बरे.

आधी गुंतवणूक मग खर्च

मासिक उत्पन्नातून आधी गुंतवणूक करण्यासाठीची रक्कम बाजूला काढून ठेवायची. त्यानंतर खर्च करायचे. पण जर याच्या उलट तुम्ही आधी खर्च मग गुंतवणूक करायचे ठरवले तर महिन्याच्या शेवटी पैसे शिल्लकच राहत नाहीत. योग्य नियोजन करून बजेट तयार करा आणि ते पाळा. काही महिन्यातच तुम्हाला फरक दिसून येईल.