Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Single Women Finance: सिंगल वूमन ने आर्थिक नियोजन कसं करावं? नोकरी पाहून स्वत:ला सांभाळताना महत्त्वाच्या टिप्स

Money Saving Tips for Single Women

मागील दहा वर्षात देशातील एकल महिलांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. नोकरी, शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. तसेच पतीच्या मृत्यूनंतर आणि घटस्फोटीत महिलांची संख्याही वाढली आहे. या एकल महिलांनी गुंतवणूक, बचत करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात, ते पाहूया.

Single Women Finance Tips: सिंगल वूमन ज्याला मराठीत ‘एकल महिला’ असेही म्हटले जाते. देशामध्ये एकल महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. नोकरी, शिक्षणामुळे उशीरा लग्न, घटस्फोट तसेच कोरोना काळात अनेक महिलांना जोडीदार गमावला. यासोबत इतरही अनेक कारणांनी महिलांवर कुटुंबाची जबाबदारी येते. एकल महिलांवर मुलांसह इतर सदस्यांची जबाबदारीही बऱ्याच वेळा येते.

अशा परिस्थितीत नोकरी करून कुटुंबाला पाहताना एकल महिलांची दमछाक होते. त्यात आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने प्रत्येक महिलेला आर्थिक व्यवहाराचे ज्ञान असेलच असे नाही.

एकटे असताना कुटुंबातील वडील किंवा इतर कोणत्या सदस्याकडे आर्थिक निर्णय काही महिला देतात. मात्र, तसे न करता ही जबाबदारी एकल महिलांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली पाहिजे. मागील दहा वर्षात एकल महिलांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. 

उत्पन्नातील किती रक्कम बचत करावी?

नोकरीला सुरुवात केल्यानंतर सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीचा 50% पगार हा कर्ज घरभाडे, विविध बील भरणा, किराणा, आरोग्य अशा महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च होतो. त्यानंतर उर्वरित 50% रकमेतून तुमच्या आवडत्या गोष्टींवर जसे की शॉपिंग, हॉटेल, मनोरंजन, गॅझेटवर खर्च करायचा की बचत करायची हे ठरते. 

दरम्यान, जर महिलेने नुकतीच नोकरी सुरू केली असेल तर एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम बचत करायला हवी. महागाईच्या दराला मागे टाकून जास्त परतावा मिळेल अशा योजनांमध्ये ही रक्कम गुंतवायला हवी. जसा कामातील अनुभव आणि उत्पन्न वाढत जाईल तसे बचत 20 टक्क्यांवरून पुढे वाढवत न्यायला हवी, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ देतात.

कारण, जसे वय वाढत जाईल तसे एकट्या महिलेला मुलांचे शिक्षण, वयोवृद्ध कुटुंबियांचे आरोग्य आणि स्वत:च्या आरोग्यावरही खर्च करावा लागेल. त्यामुळे गुंतवणूक वाढवत नेल्याने भविष्यातील अडचणींची तरतूद होईल. 

विमा आणि  एमर्जन्सी फंड

आरोग्य आणि जीवन विमा या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. एकट्या महिलेचा स्वत:चा आरोग्य विमा आणि जीवन विमा असावा. तसेच जर मुले आणि इतर कुटुंबीय असतील तर त्यांचा आरोग्य विमा आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी बचत खर्च होणार नाही. गृहकर्ज, मुलाचे शिक्षण किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर टर्म प्लॅन हवा. 

तसेच नोकरी, व्यवसायात अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे महिलांनी सहा ते आठ महिन्यांचा खर्च भागेल एवढा आणीबाणीच्या काळासाठी निधी वेगळा ठेवायला हवा. ते पैसे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कामाला येतील. दर महिन्याचा निव्वळ खर्च पकडून ही रक्कम किती असू शकते हे समजेल. समजा, तुमचा मासिक खर्च 20 हजार रुपये आहे तर सहा महिन्यांचा खर्च सुमारे 1 लाख 20 हजार रुपये एमर्जन्सीसाठी वेगळे ठेवावेत.   

निवृत्ती नियोजन 

98% महिलांनी निवृत्तीनंतरच्या जीवनाचा काहीही विचार केला नाही, असे LXME या संस्थेने 2022 साली केलेल्या अभ्यासात समोर आले होते. जेवढ्या लवकर तुम्ही निवृत्तीसाठी पैशांची बचत करता तेवढे तुम्ही उतारवयात श्रीमंत असाल. तरुण वयात काम करत असतानाच रिटायरमेंट प्लॅनिंग करा. त्यासाठी NPS, PF अशा सरकारी योजना आहेत. तर खास निवृत्तीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून SIP ही सुरू करू शकता. 

गुंतवणुकीचा स्मार्ट वे 

एकल महिलांवर आर्थिक जबाबदारी असताना गुंतवणूक करताना सुरुवातीला जास्त जोखीम घेण्याची क्षमता नसू शकते. त्यामुळे डेट किंवा लिक्विड फंडापासून गुंतवणुकीला सुरूवात करू शकता. कारण यामध्ये जोखीम कमी असते. 

तसेच पैशांची गरज पडली की तत्काळ पैसे काढता येतील. त्यानंतर हळूहळू इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करावी. कमीत कमी म्हणजे 100 रुपयांपासून गुंतवणूक सूरू करू शकता. सोबतच पोर्टफोलिओला स्थिरता येण्यासाठी सोन्यामध्ये काही गुंतवणूक फायद्याची ठरेल. 

दीर्घ आर्थिक ध्येय जसे की, निवृत्ती, घर खरेदी, मुलांचे शिक्षण यासाठी इक्विटी योजनांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. डेट फंडातून इक्विटीमधील गुंतवणूक वाढवत न्यावी. मात्र, असे करताना जोखीम किती घेऊ शकता हे पाहायला हवे. कारण, इक्विटी योजनांमध्ये जास्त परताव्यासोबत जोखीमही जास्त असते. गुंतवणुकीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिलांकडे जास्त शिस्त असते.