मृत्यूपत्र तयार करताना एक भीती अनेकांच्या मनात असते ती म्हणजे आपण नमूद केलेल्या तरतुदी किंवा अटी यामध्ये बदल करायचा झाल्यास तो करता येत नाही. अनेकांना असेही वाटते की, समजा जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाने आपण मृत्यूपश्चात संपत्तीचा हिस्सा मृत्यूपत्रात नमूद केला आणि काही वर्षांनी त्याचे वागणे बदलले किंवा त्याच्याकडून आपल्याला त्रास होऊ लागला किंवा त्याच्याकडून इतर सदस्यांना हीन वागणूक दिली जाऊ लागली तर आपल्याला आपला निर्णय बदलता येत नाही. वस्तुतः हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आपण हव्या तितक्या वेळा मृत्यूपत्र बनवू शकतो.
* कारण आपण जर वयाच्या पस्तिशी-चाळीशीत किंवा त्यापूर्वी मृत्यूपत्र बनवणार असाल तर लग्न, घटस्फोट, मुले होणे, एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू किंवा नवीन मालमत्ता ताब्यात घेणे, वारसांमध्ये बदल करण्याची इच्छा यांसारख्या सर्व घटना मृत्यूपत्र लिहिल्यानंतर काही वर्षांत घडू शकतात. आपल्या अस्तित्वात असलेल्या इच्छापत्रामध्ये आपण काही छोटे आणि मोठे बदल करू शकता किंवा आपल्याला असे वाटत असेल, की त्यानंतर काही गोष्टींमध्ये बरेच बदल झाले आहेत, तर आपण नवीन इच्छापत्र बनवू शकता.
* यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही 2010 मध्ये मृत्यूपत्र बनवले असेल आणि तुम्हाला त्यात 2022 मध्ये जर बदल करावेसे वाटले तरीही आपण ते करु शकतो. याबाबतचे निर्णयाधिकार सर्वस्वी मृत्यूपत्र करणार्याकडे असतात. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही.
* थोडक्यात, कोणीही केव्हाही मृत्यूपत्र निरस्त करु शकतो अथवा मागे घेऊन नवे मृत्युपत्र बनवू शकतो. जर एक मृत्युपत्र बनले तर मागील सर्व मृत्युपत्रे निरस्त मानली जातात. तथापि, नवीन मृत्युपत्रात जुने मृत्युपत्र (तारखेचा उल्लेख करून) रद्द कले असे नमूद करावे अथवा ते फाडून नाहीसे करावे. मृत्यूपूर्वी केलेले शेवटचे मृत्यूपत्र अंमलात आणले जाते.
* मृत्यूपत्र लिहिणार्या व्यक्तीचे लग्न झाल्यास ते आपोआप रद्द होते.
* आपल्या मनातील भीती दूर होण्यासाठी शक्यतो बदल केलेल्या मृत्यूपत्राची नोंदणी करावी. विशेषतः जर तुम्ही आधीच्या मृत्यूपत्राची नोंदणी किंवा रजिस्टर केले असेल तर ही बाब अधिक आवश्यक ठरते. अन्यथा, तुमच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांमध्ये संपत्तीवरुन काही वाद झाल्यास पूर्वी रजिस्टर केलेले मृत्यूपत्रच खरे आहे, असा दावा केला जाऊ शकतो.