शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पैसे कमवण्याची इच्छा असते. शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु, बाजारातून पैसा मिळेलच, याची हमी कोणीच देऊ शकत नाही.
बाजारातील चढ-उतारांचा अदांज लावणे जवळपास अशक्य असते. मात्र, असे असतानाही अनेकजण यातून भरपूर पैसा कमवतात. तुम्ही देखील केवळ शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात व किती पैसे गुंतवायला हवे? याविषयी जाणून घेऊया.
गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात
शेअर्समध्ये पैसे कमवायचे असल्यास इतरांचे ऐकण्याऐवजी स्वतः अभ्यास करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सुरुवातीला इंडेक्स फंडपासून सुरुवात करणे कधीही चांगले ठरते. इंडेक्स फंड हे कंपनीच्या शेअर्सच्या तुलनेत कमी जोखमीचे असतात. परंतु, यातून मिळणारा परतावा देखील फारसा नसतो.
याशिवाय, तुमच्या गुंतवणुकीत सातत्य असणे गरजेचे आहे. एकाचवेळी एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे महागात पडू शकते. तुमच्या गुंतवणुकीची विभागणी वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गरजेचे आहे. यामुळे एका कंपनीच्या शेअर्समध्ये नुकसान झाले तरीही इतर गुंतवणुकीतून फायदा होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर्सची किंमत खूपच कमी आहे अथवा खूपच जास्त आहे, या कारणावरून खरेदी करावे की नाही हे ठरवू नका. कमी भांडवल असल्यामुळे अनेकजण जास्त किंमतीचे शेअर्स खरेदी करत नाहीत. त्यामुळे भरमसाठ शेअर्स खरेदी करण्याऐवजी चांगल्या कंपनीचे जास्त परतावा देणारे शेअर्स खरेदी करावे.
किती गुंतवणूक करणे गरजेचे?
शेअर्समध्ये किती गुंतवणूक करावी अथवा सुरुवातीला किती पैसे असायला हवे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार ठरू शकते. तुम्ही अवघ्या 1 हजार रुपयांपासून पण सुरुवात करू शकता. मात्र, नोकरी न करता केवळ शेअर्समधील गुंतवणुकीतूनच पैसे कमवायचे असल्यास तुमची गुंतवणूक देखील जास्त असणे गरजेचे आहे.
सर्वसाधारणपणे शेअर्स हे वर्षाला 10 ते 20 टक्के परतावा देतात. त्यामुळे तुम्हाला जर नियमित पैसे कमवायचे असल्यास कमीत कमी 2 लाख रुपये असणे गरजेचे आहे. मात्र, बाजारातून नेहमी फायदाच होईल असे नाही. तुमचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे कधीही नियमित पैसे कमवण्याऐवजी 3 वर्ष, 5 वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेऊन गुंतवणूक करावी.
फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई शक्य आहे का?
शेअर बाजारात भरपूर पैसे आहे, असे म्हटले जाते. बाजारातून लाखो, कोट्यावधी रुपये कमवणारेही अनेकजण आहेत. पण अशा लोकांचा आकडा खूपच कमी आहे. बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांपैकी बहुतांशजणांचे नुकसान झालेले असते. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.
इंट्राडे ट्रेडिंग, फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. अनेकजण कोणतीही माहिती नसताना यात गुंतवणूक करतात. तुम्ही जर संपूर्ण अभ्यास करून व भविष्यात ज्या क्षेत्राची वाढ होणार आहे, अशा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होईल. मात्र, लक्षात घ्या की केवळ स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी न करता यातून पैसे कमवायचा असल्यास तुमची गुंतवणूकही तेवढी जास्त असणे गरजेचे आहे.